Ahmednagar Crime News: पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चार मृतदेह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नांदेडच्या करोडी येथील धम्मपाल सांगडे हा पत्नी कांचन, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करीत होता. धम्मपालची पत्नी कांचन आणि मुलांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सांगडे, मुलगी निषीधा सांगडे, संचिता सांगडे हे पोल्ट्रीफार्मवर राहत होते. धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला होता. यावेळी इतरांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला. रात्र झोपल्यानंतर पुन्हा नवरो बायकोत वाद झाल्याचे शेजारी राहणाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सकाळी पोल्ट्रीफार्मवर काम करणारा एकजण विहिरीवर मोटार सुरू करायला गेला होता. तेव्हा निषीधा सांगडे हीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. पोल्ट्रीफार्मचे चालक दिपक गोळक यांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसांत याबाबतची माहिती दिली.
घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत तीस ते पस्तीस फूट पाणी होते. वीज पंपाच्या सहाय्याने पाणी उपसले तेव्हा कांचन सांगडे, निखील सांगडे, संचिता सांगडे या तिघांचे मृतदेह सापडले. कांचन आणि तिचे तिन्ही मुले विहिरीत मृत अवस्थेत सापडले. पोलिसांनी कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलीस करीत आहेत.
अवैध धंद्याची तक्रार केल्याने दोन तरुणांवर तलवारीने वार
अवैध धंद्याची (Illegal Business) पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दोन तरुणांवर तलावारीने (Sword) वार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये (Ahmednagar) घडली आहे. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्याची तक्रार पोलिसांकडे केल्याच्या रागातून काल (19 जून) मध्यरात्री ही घटना घडली. ओंकार भागानगरे असं मयत युवकाचं नाव आहे तर शुभम पाडोळे हा या घटनेत जखमी झाला आहे.
बालिकाश्रम रस्त्यावर रुबाब कलेक्शनसमोर काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरु होते. या धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात ओंकार भागानगरे या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली होती. याच त्याने ओंकार भागानगरे आणि शुभम पाडोळे या दोन तरुणांवर तलवारीने वार केले. या हल्ल्यात ओंकार भागानगरे याचा मृत्यू झाला तर एक शुभम पाटोळे जखमी झाला आहे.