Ahmednagar Crime : पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घडना अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात घडली. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38 वर्षे, रा. आळसुंदे, कर्जत) असं क्रूर पित्याचं नाव आहे. तर ऋतुजा (वय 8 वर्षे) आणि वेदांत (वय 4 वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावं आहेत.
मुलांना विहिरीत फेकलं, दोन मुलांचा बुडून मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत (Karjat) तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (6 ऑगस्ट) ही घटना घडली. गोकुळ क्षीरसागर याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झालं. यानंतर त्याने रागाच्या भरात आठ वर्षांची ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या आपल्या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले. या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.
...पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरसागरने पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर घरापासून 600 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत आपल्या दोन्ही मुलांना फेकलं. काही वेळातच दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर गावकरी घटनास्थळी धावत गेले. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. दोन्ही मुलांना विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणलं. परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलीस काय म्हणाले?
दरम्यान या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गोकुळ शिरसागर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. गोकुळ शिरसागर याच्या दारुचे व्यसन आणि घरगुती भांडणातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. परंतु या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नांदेडमध्ये जन्मदात्या आईने दोन मुलांना विहिरीत फेकलं
अशीच घटना काही महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्यात घडली होती. कौटुंबिक वादातून जन्मदात्या मातेनेच आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून त्यांची निर्दयीपणे हत्या केली. देगलुर तालुक्यातील गुत्ती तांडा इथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत महिलेने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुत्ती तांडा येथील संतोष आडे हा कामानिमित्त हैदराबाद इथे राहत होता. मकरसंक्रांतीनिमित्त तो गावी आला होता. पतीने आपल्यालाही हैदराबाद इथे न्यावे यावरुन पती संतोष आणि पत्नी पूजा यांच्यात वाद झाला. याच वादातून पूजाच्या आई-वडिलांनी संतोष याच्या आई-वडिलांना मारहाण केली. आपल्या आई-वडिलांना पत्नीच्या आई-वडिलांनी मारहाण केल्याने संतोष हा संतापला. मरखेल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तो गेला. पती संतोष पोलीस ठाण्यात गेल्याचं समजल्यानंतर पूजाचा राग अनावर झाला. रागाच्या भरात पूजाने आपला 2 वर्षीय मुलगा सिद्धार्थ आणि 4 महिन्याची मुलगी फंदी या दोघांना स्वतःच्या वडिलांच्या शेतातील विहिरीत फेकून दिले आणि स्वतः विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा