Ahmednagar Ex Army Man Murder: अहमदनगर शहरातील एका सायं दैनिकाच्या संपादक आणि कर्मचाऱ्याला खून प्रकरणात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. राहता तालुक्यातील गोगलगाव शिवारात रविवारी दुपारी माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर यांचा मृतदेह आढळून आला होता. भोर यांच्या अंगावर असलेल्या जखमांच्या खुणांमुळे हा खून असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. त्यामुळे लोणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.


विठ्ठल भोर हे अहमदनगर येथील मनोज मोतीयानी याच्यासोबत निंबळक परिसरात 29 जुलैला प्लॉट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. भोर आणि मोतीयानी यांच्यात जमिनीच्या व्यवहारातून वाद झाले असल्याने भोर यांच्या कुटुंबीयांनी मोतीयानी याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी मोतीयानीचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपी मनोज मोतीयानी आणि त्याचा सहकारी स्वामी गोसावी याला सेंधवा, मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. 


दरम्यान, संशयित आरोपींनी स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर यांचा खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांनी दिली आहे. आरोपी मनोज मोतीयानी विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळुन नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे आणि जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण सहा गुन्हे दाखल आहेत.


नागपुरात दोन व्यापाऱ्यांची हत्या 


नागपुरातील दोन व्यावसायिकांचे अपहरण केल्यानंतर त्यांना गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर अंगावर पेट्रोल टाकून त्यांचे मृतदेह वर्धा नदीत  फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून राज्याची उपराजधानी (Nagpur)  हादरली आहे. पैशाच्या व्यवहारातून हे हत्याकांड घडल्याची बाब पोलीस तपासात समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.


आरोपींनी निराला सिंग आणि अमृत गोळे यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून नागपूर अमरावती महामार्गावरील कोंढाळी गावानजीकच्या लकी तुरकेल याच्या फार्म हाऊसवर घेऊन गेले. फार्म हाऊसवर वर गेल्यावर 2 कोटी 80 लाख रुपये थोड्याच वेळात एक जण घेऊन येत आहे अशी बतावणी करून दोघांनाही एका खोलीत बसवले. बराच वेळ होऊ नये कोणीच पैसे घेऊन आले नाही, त्यामुळे निराला सिंग आणि अमरीश गोळे यांना संशय आला त्यांनी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र भीती पोटी आरोपींनी  गोळी झाडली त्यामुळे घटनास्थळी दोघांचाही मृत्यू झाला.