अकोले, अहमदनगर : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, अशातच महाराष्ट्रातील पर्यटनाचं केंद्र असलेल्या भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरात देखील रविवारी (13 ऑगस्ट) सकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या भंडारदरा धरण परिसरात रंधा धबधबा (Randha Fall), नेकलेस फॉल (Necklace Fall), भंडारदरा धरण (Bhandardara Dam), अम्ब्रेला फॉल (Umbrella Fall) अशी विविध पर्यटनस्थळं आहेत.
धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी
भंडारदरा धरण परिसरातील पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठी गर्दी होते. त्यातच आता सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याची परंपरा याही वर्षी कायम असल्याने निसर्गरम्य परिसराचं रूप आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.
पर्यटकांसाठी विशेष नियमावली
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी विशेष नियमावली बनवण्यात आली आहे. भंडारदरा धरण क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. नगर-पुणे मार्गे येणारे पर्यटक वाकी फाटा मार्गे भंडारदरा धरणावर पोहोचू शकतात, तर मुंबईहून येणारे पर्यटक थेट भंडारदरा धरण परिसरात पोहोचू शकतात. पर्यटकांचं मुख्य आकर्षणाचा केंद्र असलेल्या रंधा फॉल (Randha Fall) या ठिकाणी एकेरी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे.
सेल्फी काढताना सावधान
रंधा फॉल (Randha Fall) येथे अनेक हिंदी चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. रंधा धबधबा हे पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र आहे, या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून येथील अनेक जागांवर पर्यटक आपल्या जीवावर उदार होत सेल्फी घेताना दिसून येत आहेत. संरक्षण कठडे लावलेले असतानाही संरक्षण कठडे ओलांडून अनेक पर्यटक सेल्फी घेण्यासाठी धबधब्याच्या जवळ जात आहेत. मात्र पर्यटकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेत पर्यटन करावं, असंच आवाहन एबीपी माझा सुद्धा करत आहे.
अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, कोथाळणे परिसरात गेले अनेक दिवस चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 100 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सततच्या पावसाने परिसर हिरवागार झाला असून परिसरातील अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. तसेच पावसामुळे शेतकरी बांधव भात लागवडीसाठी सज्ज झाले आहेत.
हेही वाचा: