अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या थंडीची लाट (Cold Wave) अनुभवायला मिळत असून जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वातावरणामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे. थंडीपासून बचाव होण्यासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहे. परंतु, दुसरीकडे पाळीव जनावरांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी पशुपालक देखील विविध उपाय योजना करताना पाहायला मिळतंय.
अहिल्यानगर शहरात जवळच असलेल्या जगदीश भोसले (Jagdish Bhosale) या दूध उत्पादकाने आपल्या गोठ्यातील जनावरांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी गोठ्यामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये वापरण्यात येणारे दीडशे व्हॅटचे चार हॅलोजन लाईट लावले आहेत. हॅलोजनच्या पडणाऱ्या उष्णतेने जनावरांना ऊब मिळत असून जनावरांचे थंडीपासून संरक्षण होत आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सल्ला
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 16 लाख गाय आणि म्हैसवर्गीय जनावरे आहेत तर सुमारे 15 लाख एवढ्या शेळी आणि मेंढ्या आहेत. हिवाळ्यामध्ये जनावरांना हायपोथेरमिया म्हणजेच जनावरांचे तापमान कमी होतं. मुख्यतः हा धोका वासरांमध्ये, शेळ्यांच्या करडांमध्ये होत असतो. जनावरांना प्रामुख्याने हायपोथेरमिया होऊ नये यासाठी कोरडा चारा जनावरांना द्यावा. जनावरांना हिरवा चारा देणे टाळावे. त्याचबरोबर पशुखाद्यामध्ये गहु, मका यांचे प्रमाण जास्तीत जास्त असलेले पशुखाद्य जनावरांना द्यावे. हिवाळ्यामध्ये पाणी जास्त थंड असल्याने जनावरांना ती पाजल्याने ते पचवण्यासाठी त्यांची ऊर्जा जास्त खर्च होतो. यासाठी जनावरांना पिण्यासाठी कोमट पाणी दिल पाहिजे. त्यानंतर जनावरांचा गोठा हा सदैव कोरडा राहील याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुंबारे यांनी म्हटले आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
दरम्यान, राज्यात सध्या सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद धुळे येथे करण्यात आली आहे. धुळ्याचे तापमान 4.3 अंशांवर पोहोचले आहे. तर, परभणी, निफाज, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथेही थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील काही दिवस पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील कोरड्या वाऱ्यांचा झोत अधिकाधिक वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं झेपावत राहिल्यास राज्यावर हाडं गोठवणाऱ्या थंडीची पकड आणखी मजबूत होणार आहे, उत्तर महाराष्ट्र यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र असेल. तर, राज्याच्या उर्वरित भागात मात्र थंडीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
आणखी वाचा