Agriculture News : जुलै महिन्याचा पंधरवाडा संपत आला तरी अद्याप राज्यात म्हणावा तसा पाऊस (Rain) झाला नाही. काही भागातच पावसानं हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसानं ओढ दिल्यानं दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. तर काही भागात फळबागांची होरपळ सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला आहे.
अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या
अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. बागायत भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे मात्र दक्षिण नगर जिल्ह्यातील जिरायत पट्ट्यामध्ये अद्यापही अनेक ठिकाणी पेरणी खोळंबली आहे. नगर तालुक्यातील वाळकी आणि खडकी भागातील फळबागांची होरपळ सुरु झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. मात्र, तरी देखील फळबागा वाचवू शकले नाहीत. वाळकी परिसरातील संजय भालसिंग यांच्या संत्र्याची बाग जळून गेली आहे. यामध्ये त्यांचं मोठ नुकसान झालं आहे.
आत्तापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात केवळ 95 मिलिमीटर पावसाची नोंद
दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 172 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा केवळ 95 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला असल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी शिल्लक असून त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही, मात्र तरी देखील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केलं आहे. पुढे जाऊन पावसानं जर अशीच ओढ दिली तर मात्र चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखील जिल्हाधिकारी सालीमठ यांनी म्हटलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिथं पाणीटंचाई आहे तिथं 47 टँकरच्या माध्यमातून सध्या पाणीपुरवठा होत असल्याचे माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
कोकण वगळता अन्य भागात सारखीच परिस्थिती
राज्यातील कोकण सोडल्यास इतर भागात सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याचा चित्र राज्यभरात आहे. यावर्षी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आणि एल निनोच्या प्रभावामुळं मान्सून कमी असण्याची शक्यता निर्माण करण्यात आली आहे. अशातच उशिराने आलेल्या मान्सूनमुळं राज्यभरातील पेरण्यात खोळंबल्या आहेत. राज्यात आतापर्यंत फक्त 47 टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: