Shirdi News : सलग दोन वर्ष कोरोना महामारीमुळे अनेक निर्बंध लादले गेले. देवदर्शनापासून अगदी सगळ्याच गोष्टींवर निर्बंध लादल्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा फटका बसला. सलग दोन वर्ष निर्बंध असल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. मात्र, कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर साई मंदिर (Sai Mandir) ऑक्टोबर 2021 मध्ये भक्तांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर गेल्या सात महिन्यात साईंच्या दानपेटीत तब्बल 188 कोटींपेक्षा जास्त विक्रमी दान जमा झाले आहे. साई मंदिर खुले झाल्यानंतर गेल्या सात महिन्यांतच 64 लाख भाविकांनी शिर्डीला (Shirdi) येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
शिर्डी हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक शिर्डीत येतात. तसेच साईबाबांच्या श्रद्धेपोटी भाविक लाखो रूपये, सोने-चांदी तसेच इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. कोरोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी साईंच्या दानपेटीत भरभरून दान दिले असून ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
कोविड (Covid-19) काळात लॉकडाऊनमुळे शिर्डीचे अर्थकारण पूर्णतः थांबले होते. तसेच कोणत्याही प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना मिळत नव्हती. मात्र, कोविड काळानंतर साई मंदिर पुन्हा भाविकांसाठी सुरू झाल्याने देशभरातील साईभक्तांची रेलचेल पुन्हा सुरु झाली आहे. तसेच यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला पुन्हा सुरुवात झाली आहे हे मात्र नक्की.
महत्वाच्या बातम्या :