मुंबई: सोलापूरमध्ये एमआयएमच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला असून प्रेषित पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी या मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. सोलापूरसह अहमदनगरमध्येही मुस्लिम बांधवांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे. नुपूर शर्मांच्या अटकेच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी बंद पाळला..
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशभरातून अनेक मुस्लिम संघटनांनी त्याचा निषेध व्यक्त केला. त्याच पार्श्वभूमीवर आज सोलापुरात एमआयएमने भव्य मोर्चा काढला. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर मुस्लिम बांधवांनी प्रचंड मोठी गर्दी केली असून नुपूर शर्मा यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगरमध्ये बंदची हाक
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आज अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी बंदची हाक दिली. नुपूर शर्मांच्या अटकेच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी बंद पाळला. हा
बंद शांततेत पाळण्याचे मुस्लिम बांधवांचे आवाहन केलं होतं. देशात जातीय द्वेष भावना पसरणारे राजकारण बंद करण्याचे मुस्लिम बंधावांनी आवाहन केलं आहे.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. भाजपने त्यांना पक्षातून निलंबितही केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात विविध ठिकाणी 50 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
एमआयकडून औरंगाबादेत आंदोलन; जलील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी खासदार जलील सुद्धा उपस्थित असून, शेकडो कार्यकर्ते आंदोलनास्थळी जमा झाल्याने दिल्ली गेट परिसरात ट्राफिक पूर्णपणे जाम झाली आहे. तर घटनास्थळी खुद्द पोलीस आयुक्त दाखल झाले आहेत.
जालन्यातही आंदोलन
जालन्यातील मामा चौक येथे ऑल इंडिया ईमाम कौन्सिलच्या वतीने नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी मुस्लिम बांधवांनी भाजप तसेच नुपूर शर्मा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आंदोलकांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केली आहे.