उस्मानाबाद : महाराष्ट्रातील वृक्ष लागवडीवरुन अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. शिवाय हे करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचं कुरण आहे. 5 कोटी वृक्ष लागवड हेच मुळात थोतांड असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे.


राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतली आहे. यामध्ये 33 कोटी वृक्ष लावण्याचं लक्ष्य सरकारचं आहे. तसा निर्धार राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मात्र राज्य सरकारची ही वृक्षलागवड योजना फक्त दिखाव्यापुरती आहे, अशा शब्दात सयाजी शिंदेंनी सरकारवर टीका केली.



आपल्याकडे झाडांच्या जवळपास 250 जाती उपलब्ध असताना अनेक ठिकाणी, शाळांच्या अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यांमध्ये जाऊन झाडे लावली जातात. 33 कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा गाठण्यासाठी सरकार कोणतीही झाडं लावत आहे. वनखात्याच्या नियोजन शून्य कारभारावर बोट ठेवत वृक्ष लागवड हे केवळ नाटक असल्याचा आरोप सयाजी शिंदे यांनी केला.


आपल्याकडून राज्यात 23 ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये माझ्याकडून वृक्ष लागवडीचं काम सुरु आहे. मात्र मी त्याचा शूटिंग करत नाही. येत्या काळात ही संख्या आणखी वाढेल. झाडे लावतांना कोणत्या ठिकाणी कोणतं झाड लावावं यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ मंडळी आहेत, अशी माहिती सयाजी शिंदेंनी दिली.