नागपूरः अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती एस.आर.त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला. ही घटना मानकापूर परिसरातील आहे.
गुरुदयाल उर्फ राजू रामेश्वर खतरिया (वय 30) असे आरोपीचे नाव आहे. घटनेपूर्वी तो झिंगाबाई टाकळीतील गीतानगरात भाड्याने राहत होता. घटनेच्यावेळी पीडित मुलगी 16 वर्षांची होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात फसविले होते. दरम्यान, त्याने मुलीला पळवून नेण्याचा कट रचला. त्यानुसार, त्याने एप्रिल 2020मध्ये मुलीला भेटण्यासाठी बोलावले. त्याच्या सांगण्यावरुन मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असल्याची माहिती देऊन दुपारी 4च्या सुमारास घरून निघून गेली. त्यानंतर ती घरी पत आली नाही. आरोपीने तिला दुचाकीवर बसवून गोधनी परिसरातील झोपडीत नेले. तेथे त्याने मुलीवर वारंवार बलात्कार केला होता.
नऊ साक्षीदारांची तपासणी
न्यायालयात सरकारच्यावतीने अॅड. कल्पना पांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपीविरुद्ध 9 साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय पुराव्यांवरुन आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.
बालकाच्या खुनातील आरोपीला जामीन
नागपूरः सत्र न्यायालयाने नंदनवन येथील बालकाच्या खून प्रकरणातील आरोपी सौरभ वैरागडे (वय 21) याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
वंशिल डोईफोडे (वय 11) असे मृत बालकाचे नाव होते. 14 डिसेंबर 2021 रोजी वंशिल व त्याची लहान बहीण चिप्स खरेदी करण्यासाठी दुकानात गेले होते. दरम्यान आरोपी वैरागडे व श्रेयस मेश्राम (20) यांनी वंशिल डॉलीला निर्जन गल्लीत नेले आणि वंशिलला बुक्कांनी जबर मारहाण केली. त्यानंतर वंशिलची तब्येत खराब झाली व तो 19 डिसेंबर रोजी मरण पावला, अशी तक्रार आहे.
पाच आरोपींना अटपूर्व जामीन
नागपूरः जमीन विक्री व्यवहाराच्या वादातून फसवणूक व इतर संबंधित गुन्हे दाखल झालेल्या पाच आरोपींना सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. कमलेश दाढे, नारायण डेंबले, गौरीशंकर सचानी, अतुल डेंबले व विजय रमाणी अशी आरोपींची नावे असून, ते जमिनीचे मालक होते. पिरॅमिड रियल्टर्सचे नावेद साजित अली व इतरांनी या आरोपींची चिंचभवन येथील 26.20 एकर जमीन 18 कोटी 22 लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यानंतर आरोपींनी संपूर्ण रक्कम घेऊन केवळ 16.87 एकर जमिनीचे विक्रीपत्र करून दिले. अशी तक्रार आहे. आरोपींतर्फे वरिष्ठ अॅड. अविनाश गुप्ता, अॅड. एम.बी. नायडू व अॅड. शेख सोहोलुद्दीन यांनी बाजू मांडली.