Flood Situation in Assam : आसाम (Assam) राज्यात पुरानं हाहाकार घातला आहे. पुराच्या पाण्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं लाखो लोक बेघर झाले आहेत. जवळपसा 45 लाखाहून अधिक नागरिकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. तसेच मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झालं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात या पुरामुळं आणि भूस्खलन झाल्यामुळं आसाममध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आत्तापर्यंत मृत्यूचा आकडा हा 117 वर पोहोचला आहे.
पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात
आसाममध्ये काही ठिकाणी पुराचं पाणी हळूहळू कमी होताना दिसत आह. मात्र, काही ठिकाणी अद्यापही स्थिती गंभीर आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे एकूण 117 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 100 लोक पुराच्या प्रभावामुळं तर 17 लोकांचा भूस्खलनामुळं मृत्यू झाला आहे. एका अहवालानुसार, गेल्या 24 तासात आसाममधील 28 जिल्ह्यांतील 2 हजार 510 गावांमधील लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर 91 हजार 658.49 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं क्षेत्र पुरामुळं बाधित झालं आहे.
मदत आणि बचावकार्य सुरुच
सध्या लष्कर, पोलीस दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), SDRF, अग्निशमाक आणि आपत्कालीन दलातील जवानांसह स्वयंसेवकां मदत आणि बचावकार्य सुरुच आहे. जिल्हा प्रशासनाला अनेकजण मदत करताना दिसत आहेत. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील पुरामुळं लाखो लोक बेघर झाले आहेत. प्रभावित नागरिकांसाठी एकूण 717 मदत शिबिरे आणि 409 मदत वितरण केंद्रे उघडण्यात आली आहेत. या मदत छावण्यांमध्ये 2 लाख 65 हजारांहून अधिक लोकांना निवारा देण्यात आला आहे. आसाममधील पूर परिस्थितीवर केंद्र सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पूरग्रस्त भागात उपस्थित आहेत. त्याच्या माध्यमातून बचाव कार्य सुरु आहे. बाधित लोकांना मदत करत आहेत