ABP Ideas Of India : सध्या देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत आहे. स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षानिमित्त ABP नेटवर्क विविध क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणत आहे. ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील विचारप्रवर्तक लोक आणि उत्कृष्ट विचारसरणी या मंचावर पाहायला मिळणार आहे. हे दिग्गज भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलणार असून, देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल त्यांचे विचार शेअर करणार आहेत.


या सत्राची सुरुवात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी (Kailash Satyarthi) यांच्या संवादाने झाली. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी एबीपी न्यूजच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2022’मध्ये सहभाग घेतला. त्यांनी 'द ह्युमनिटी इंडेक्स' या विषयावर चर्चा केली. कैलाश सत्यार्थी म्हणाले की, भारताचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्वांना समान शिक्षण मिळेल. त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे कामही आम्ही करू. 


देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळण्याचा अधिकार!


येत्या 25 वर्षात भारताने असे काय केले पाहिजे, की ज्यामुळे भारताकडे पुन्हा एकदा ‘सोन्याचा पक्षी’ म्हणून पाहिले जाईल?, या प्रश्नाला उत्तर देताना कैलाश सत्यार्थी म्हणाले की, देशातील प्रत्येक मुलाला निर्भयपणे शाळेत जाता आले पाहिजे. त्याला शिक्षणाचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. देशातील मोठे उद्योगपती आणि नेत्यांच्या मुलांना जसे शिक्षण मिळत आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक घटकाला शिक्षण मिळाले पाहिजे. या संकल्पनेवर विचार करण्यासाठी माझ्याकडे गांधीजींनी प्रेरित केलेळा एक उपाय आहे. विचार करा, देशातील एका अत्यंत गरीब भागातील एक मुलगी, जिचा जन्म गुलामगिरीत झाला आहे, जिचे आई-वडील बंदी/गुलाम म्हणून जगतात. ज्यांच्या मुलांचा वापर सर्व प्रकारच्या लैंगिक शोषणासाठी, तस्करीसाठी केला जाऊ शकतो. आज जर आपण सर्वांनी त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू आणले, तर 25 वर्षांनंतर भारत जगातील सर्वात महान देश होईल.


स्वप्नात मोठी शक्ती असते : कैलाश सत्यार्थी


शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले कैलाश सत्यार्थी म्हणाले की, मी जे काही बोललो ते शक्य आहे. जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा ही समस्या नव्हती. बालमजुरी, बाल तस्करी असे शब्द ऐकू येत नव्हते. आपल्या देशात स्वतःचा कायदा नव्हता. परंतु असे असतानाही, स्वप्नांमध्ये मोठी शक्ती होती. आपण यात सामील झालो तर आपण काहीही साध्य करू शकतो. स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ तर, आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. भारत समस्यांसाठी नव्हे तर, उपायांसाठी ओळखला जातो. आपण सर्व उपायच आहोत. यासाठी आपल्या सरकारने आपल्या बजेटमध्ये मुलांना प्राधान्य दिले पाहिजे. आपली 40 टक्के लोकसंख्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. पण त्यांचे शिक्षण, सुरक्षा आणि आरोग्य मिळून आपल्या जीडीपीच्या 4 टक्क्यांपेक्षा कमी खर्च येतो. या देशात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहून गुलामगिरीत जगत असेल, तर आपण स्वतःला आरशात बघितलं पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे की, ही मुलं दुसऱ्या कोणाची नसून ती भारतमातेची लेकरं आहेत.


एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिटमध्ये देशभरातील अनेक सेलिब्रिटी सहभागी होत आहेत आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे म्हणाले की, भविष्यातील भारताचे स्वप्न साकार करण्याचा आयडियाज ऑफ इंडियाचा उद्देश आहे. या कार्यक्रमांद्वारे भविष्यातील भारतासाठी एक रोडमॅप तयार करता येईल, अशी आशा आहे.



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha