कवलापूर या 32 हजार लोकसंख्येचं गावात, अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर शेती होते. यातील सरासरी अडीचशे हेक्टरवर यंदा गाजराची लागवड झाली आहे.
गावातीलच दत्तात्रय माळी अनेक वर्षापासून या दीड एकरावर गाजराचं पीक घेतात.कमी कालावधीत चांगला नफा देणारं हे पीक. त्यामुळंच यंदा त्यांनी गावातील तब्बल ३० एकर शेती भाडे तत्त्वावर घेऊन यात गाजराची लागवड केली.
दत्तात्रय माळी यांनी सप्टेंबर महिन्यात जमिनीची चांगली नांगरट केली. शेणखत घालून जमीन भुसभुशीत केली. आणि यात गाजराचं बियाणाची लागव़ड केली. लागवडीसाठी त्यांना एकरी १० ते १२ किलो गाजराचं बियाणं लागलं. यानंतर रासायनिक खताचा हप्ता दिला. १५ दिवसाच्या अंतरानं पाणी दिलं. ८ ते १० दिवसात रोपांची उगवण झाली. ३ महिन्यात ही गाजरं जमिनीत पोसतात. यानंतर यांची पानं काढून टाकली जातात. आणि गाजराची काढणी सुरु होते.
गाजरांचं वॉशिंग सेंटर. गाजरं धुण्यासाठी गावानं केलेला हा जुगाड. इथं एका ड्रममध्ये गाजरं टाकतात. ५ हॉर्स पॉवरच्या मोटारीवर ड्रम फिरतो. पाण्याच्या मदतीनं ड्रममधील गाजरं स्वच्छ होतात. यानंतर गाजरं पोत्यात भरून बाजारात रवाना केली जातात.
दत्तात्रय यांना गाजराचं एकरी सरासरी ७ ते ८ टन उत्पादन मिळतं
बाजारात १० किलो गाजराला ७० ते ११० रुपयाचा दर मिळतो
बियाणं,मजूरी,वाहतूक, खतं, जमिनीचं भाडं असा ३० ते ४० हजाराचा खर्च होतो.
एकरी ४० हजारांचं निव्वळ उत्पन्न त्यांना शिल्लक राहतं.
म्हणजेच ३० एकरातून अवघ्या ३ महिन्यात दत्तात्रय यांना ९ ते १० लाखांचा नफा ही लाल गाजरं मिळवून देतात.
द्राक्ष, ऊस अशी पिकं पंचक्रोशीत घेतली जातात. मात्र या पिकांपासून उत्पन्न मिळवण्यासाठी किमान वर्षभर थांबावं लागतं. शिवाय उत्पादनखर्चही भरमसाठ होतो. यावरच उपाय शोधत दत्तात्रय यांनी नगदी पिकांना कमी कालावधीच्या गाजराचा पर्याय दिलाय.