बुलडाणा: दुग्ध व्यवसाय परवडत नाही असं म्हणत बरेच शेतकरी या व्यवसायाकडे पाठ फिरवतात. मात्र योग्य नियोजन केल्यास हा व्यवसायही लाखोंचा नफा मिळवून देऊ शकतो. हेच सिद्ध करुन दाखवलंय बुलडाणा जिल्ह्यातील गोविंद आणि राहुल पवार या बंधूंनी.

30 म्हशी आणि 3 गाईंच्या जोरावर ते आज महिना दीड लाखांचा नफा कमावत आहेत.

महिना 90 हजाराचा नफा देणारा दूध व्यवसाय. जोडीला 17 एकर शेती. ही यशोगाथा आहे बुलढाणा जिल्ह्यातील सवना गावच्या राहुल आणि गोविंद पवार बंधूंची.

वडिलोपार्जित शेती कोरडवाडू असल्यानं निसर्गावर अवलंबून होती. त्यातून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्याला जोडधंदा म्हणून 2 म्हशींपासून दूध व्यवसायाची सुरुवात केली. पुढे त्यात वाढ होत गेली. आज त्यांच्याकडे 30 म्हशी आणि 3 गाई असं पशूधन आहे.

या व्यवसायामध्ये त्यांचा चांगला जम बसला. चिखली शहरात 50 रुपये लिटर प्रमाणे ते कोऱ्या दुधाची विक्री करतात. चिखली शहरात पवार बंधूंचा श्रीकृष्ण डेअरी व्यवसायदेखील आहे.

गोठ्यातील 30 म्हशींपासून त्यांना रोजचं 200 लिटर दूध मिळतं. 50 रुपये लिटर प्रमाणे रोजचे 10 हजार मिळतात. असं महिन्याला 3 लाखांचं उत्पन्न पवार बंधूंना मिळतं.

यातून खर्च वजा जाता महिना 90 हजाराचा निव्वळ नफा मिळतो. पवार बंधूंनी बचत गटाचीही सुरुवात केली. त्याद्वारे विक्री केलेल्या दूधापासून 10 रुपये लिटर प्रमाणे कमीशन मिळतं. यातून 1500 रुपयाचा रोजचा निव्वळ नफा त्यांना मिळतो. महिन्याला 45 हजारात नफा त्यांना यातून मिळतो.

एवढ्यावरच न थांबता त्यांनी दुधाचा प्रक्रिया उद्योगही सुरु केला. दही, ताक, पनीर अशा पदार्थांच्या विक्रीतून त्यांना महिना 10 हजारांचा निव्वळ नफा मिळतो. असा एकूण महिन्याला 1 लाख 45 हजारांचा नफा पवार बंधू मिळवत आहेत.

शेणखत आणि पाणी व्यवस्थापनामुळे पवार बंधूंची 17 एकर कोरडवाहू शेती आता बागायती झाली आहे. या शेतीतून त्यांना वर्षाला 7 लाखांचं उत्पन्न मिळतं. शेतीशिवाय हा जोडधंदाच पवार बंधूंना फायद्याचा ठरला आहे.

एका क्लास वन अधिकाऱ्या प्रमाणे आज पवार बंधू नफा कमावत आहेत. योग्य नियोजन केल्यानं हे यश त्यांना मिळालं. परवडत नाही म्हणून दूध व्यवसायाकडे पाठ फिरवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पवार बंधू प्रेरणा ठरलेत.