नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे.


निवडणूक आयोगानं गुजरातच्या निवडणुका हिमाचल प्रदेशच्या निवडणूक कार्यक्रमासोबत जाहीर न केल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणांगणांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही ताकदीनं उतरल्यानं भाजपसाठी ही निवडणूक आणखीनच प्रतिष्ठेची बनली आहे.

तारखेवरुन वाद

यंदा गुजरात विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक तारखांवरुन सातत्याने वाद सुरु आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी 12 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मात्र त्यावेळी गुजरात निवडणुकीच्याही तारखा जाहीर होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती झाली नाही.

हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबरला मतदान आहे. तर प्रचंड विरोधानंतर निवडणूक आयोगाने गुजरात निवडणूक 18 डिसेंबरपूर्वीच पार पडले असं सोमवारी जाहीर केलं होतं.

गुजरातचं रण का महत्त्वाचं?

गुजरात निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथे काँग्रेसने आव्हान दिलं आहे. त्याचमुळे नरेंद्र मोदी यांनी महिनाभरात तब्बल 5 वेळा गुजरात दौरा केला.

गुजरात निवडणुकीला 2019 च्या लोकसभेची सेमीफायनल मानलं जात आहे. मोदी लाट आहे की नाही हे या निवडणुकीतून समोर येणार आहे.

दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निवडणुकीत जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी येण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

गुजरात विधानसभेची 2012 ची स्थिती काय?

गुजरात विधानसभेसाठी 2012 मध्ये 182 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपने 115, काँग्रेस 61 आणि अन्य 6 जागा जिंकल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत सर्व जागा भाजपला

लोकसभेसाठी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपने सर्वच्या सर्व म्हणजे 26 जागा जिंकल्या होत्या.

 निवडणूकपूर्व सर्व्हे

सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.  मात्र आज तक, इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचंच सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपला 115 ते 125 जागा तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असं या सर्व्हेत नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला सध्या नोटाबंदी आणि जीएसटीमुळे विरोधाचा  सामना करावा लागत आहे. त्यामुळे गुजरातमध्ये नागरिक कोणाला मत देणार हे पाहणं महत्वाचं असेल.