अर्ध्या एकरात पसरलेली गवती चहाची लागवड सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातली आहे. हत्तेगावच्या महादेव वाघमारे यांची ही शेती.
शेतीतून मिळणाऱ्या पैशातून घरखर्च भागत नसल्यानं महादेव हे मुंबईत आले. भायखळ्यात नोकरी करु लागले. मात्र मुंबईतही खर्च भागत नसल्यानं पुन्हा गावाकडं परतले. शेतीतील तुटपुंज्या उत्पन्नात काहीच भागत नव्हतं. अशातच काही मित्रांनी गवती चहाच्या लागवडीचा सल्ला दिला. प्रयोग म्हणून सहा वर्षापूर्वी 1 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिकेत गवती चहाची रोपं तयार केली. आणि त्याची अर्ध्या एकरात लागवड केली.
लागवडीपूर्वी महादेव यांनी जमिनीची चांगली मशागत केली. 3 फुटांच्या सरी सोडून बेड तयार केले. त्यात 1 फुटांचं अंतर सोडून गवती चहाच्या फुटव्यांची लागवड केली. लागवडीनंतर अडीच महिन्यानंतर गवती चहाची कापणीस आला.
गवती चहाला बुरशीजन्य रोगांचा धोका असतो. त्यासाठी दर पंधरा दिवसांच्या अंतरानं बुरशीनाशकांच्या फवारण्या घेणं गरजेचं आहे.
एकदा लागवडीनंतर 2 वर्षांपर्यंत गवती चहाचं उत्पादन सुरु राहतं. दर दोन महिन्यांनी चहाची कापणी केली जाते. त्यातील खराब पानं बाजूला काढून चांगली पानांच्या पेंड्या बांधल्या जातात. त्याचं वजन केलं जातं. आणि ही पानं पोत्यात भरली जातात.
*20 गुंठ्यातून 1300 ते 1500 म्हणजेच साडेसहा ते सात क्विंटल पानांचं उत्पादन मिळतं
*ज्याला बाजारात सरासरी 30 रुपये किलोचा दर मिळतो.
*यातून 2 लाख 10 हजारांचं उत्पन्न त्यांना मिळतं.
*यातून मजुरी, वाहतूक , खतं असा 75 हजारांचा खर्ज वजा जाता महादेव यांना 1 लाख 35 हजारांचा निव्वळ नफा होतो.
बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी महादेव यांनी नवीन पिकाचा प्रयोग केला. गवती चहाची व्यवस्थित माहिती घेतली. बाजाराचं गणित केलं. आणि शास्त्रीय पद्धतीनं गवती चहाची लागवड केली. गवती चहाच्या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबाचा गाडा आज व्यवस्थित चालतोय.
चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, सांगली