नाशिक : योग्य व्यवस्थापनाला सेंद्रीय शेतीची जोड असेल, तर भरघोस उत्पन्न निश्चितच मिळतं. ही सेंद्रीय शेती फक्त जमिनीचा पोत सुधारत नाही, तर एका ऊसतोड कामगाराला 70 एकराचा बागायतदारही बनवते. नाशिक जिल्ह्यातील रवींद्र पवार हा अनुभव जगत आहेत. आज लाखो-कोटींची उलाढाल करणारा हा शेतकरी, काही वर्षांपूर्वी ऊसतोड कामगार होता हे सांगितलं तर तुमचा विश्वास बनणार नाही.


सेंद्रीय डाळिंब पिकाने एका ऊसतोड कामगाराला 70 एकर शेतीचा मालक बनवलं. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्यातील सातमाने गावच्या रवींद्र पवार यांची. काही वर्षांपूर्वी हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना ऊसतोड कामगार म्हणून काम करावं लागलं. वडिलोपार्जित ३ एकर शेतात ते याआधी पारंपरिक पीकं घ्यायचे. नंतर 30 गुंठ्यात त्यांनी डाळिंबाची लागवड केली आणि तिथूनच त्यांना प्रगतीचा मार्ग सापडला.



रवींद्र पवार यांनी संपूर्ण 3 एकरात डाळिंबांची लागवड केली. यातून जो काही नफा मिळत गेला, त्यातून त्यांनी जमीन खरेदी केली आणि आज ते 70 एकर जमिनीचे मालक झाले. डाळिंबांची लागवड करताना त्यांनी इतर डाळिंबांच्या शेतांना भेटी दिल्या. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतात 2 कोटी लिटरचे 2 शेततळं बांधली. ही डाळिंबांची संपूर्ण बाग सेंद्रीय पद्धतीने वाढवलेली आहे. विषमुक्त आणि चांगल्या दर्जाची फळं असल्याने व्यापारीही जागेवर खरेदी करत आहेत.

85 रुपये प्रति किलोचा दर त्यांना मिळत आहे. सध्या 4 एकरातील डाळिंबांची काढणी सुरु आहे. यातून एक ते सव्वा लाखांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे. एकूण 40 एकरातील बागेतून 2 कोटींपर्यंतचं उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.



पवार यांनी 70 एकरातील क्षेत्रापैकी 40 एकरात डाळींब, 20 एकरात द्राक्ष आणि 10 एकरात सिताफळ आणि पेरुची त्यांनी लागवड केली आहे. सेंद्रीय पद्धतीचा वापर केल्याने फळांवर रोगांचा प्रादुर्भाव होणं कमी झालं आहे. फळांचा दर्जा उत्तम असल्याने, त्यांना निर्यातीसाठी पाठवलं जातं.

आता रविंद्र यांची मुलं ही शेती सांभाळतात. डाळिंबांच्या झाडांना उन्हापासून संरक्षण देण्यासाठी, पांढऱ्या नेटचा वापर केला आहे. बागेच्या व्यवस्थापनापासून विक्रीपर्यंतचं सगळं नियोजन ते करतात.



अशाच वेगवेळ्या प्रयोगांमुळे पवार यांच्या शेतीची आणखी भरभराट होत आहे. योग्य नियोजन आणि सेंद्रीय पद्धतीच्या वापरामुळे रवींद्र पवार यांना हे यश मिळवता आलं. त्यांची ही सेंद्रीय शेती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरते आहे.

पाहा व्हिडीओ