कोल्हापूर:  कुमार आणि प्रभाकर हे दोन जिवलग मित्र, त्यांनी एकत्र येऊन शेती करायला सुरुवात केली. त्यांनी भाडेतत्वावर शेती घेऊन ढोबळी मिरचीची लागवड  केली. हार्ड वर्कची सांगड स्मार्ट वर्कसोबत घातल्याचं फळ त्यांना मिळतंय.

येत्या काही महिन्यात ढोबळी मिरची त्यांना 35 ते 40 लाख रुपये मिळवून देईल. या जिवलग मित्रांच्या यशाचं रहस्य काय, याचा हा आढावा-

वेगवेगळ्या गावच्या असणाऱ्या दोन मित्रांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच भाडे तत्वावर तीन एकर जमीन घेतली. त्यामध्ये त्यांनी ढोबळी मिरचीची लागवड केली. जानेवारीत रोपांची लागवड केलेल्या मिरचीचं आता उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे.

अत्यंत आकर्षक आणि तजेलदार असलेल्या या मिरचीला सरासरी सध्या 15 रुपये किलो जागेवर दर मिळत आहे. या तीन एकरातून 250 टन ढोबळी मिरचीचं उत्पादन या दोन मित्रांना अपेक्षित आहे.

बुलडोझरवर मैत्री
कोल्हापूर जिल्ह्यातील देवाळे गावचे प्रगतशील तरुण शेतकरी कुमार पाटील आणि बेले गावचे प्रभाकर पाटील. पंधरा वर्षांपूर्वी बुलडोझरवर काम करत असताना दोघांची मैत्री झाली.

दोघे वेगवेगळ्या गावचे असले तरी जिवलग मित्र आहेत. दोघांच्या गावात 6 किलोमीटरचं अंतर. दोघेही भाजीपाला उत्पादक शेतकरी. एकमेकांना विचारुन, सल्ला मसलत करत, गेली पंधरा वर्ष शेती करत आहेत. शेती हाच त्यांच्या एकत्र आलेल्या मैत्रीचा धागा असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

एकत्रित शेतीचा निर्णय

गेल्या वर्षी त्यांनी एकत्रित येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. जवळच असणाऱ्या कळंबा गावात रंगराव पाटील यांची सव्वा तीन एकर शेती 75000 वार्षिक भाडे तत्वावर घेतली आणि सुरु झाला एकत्रित शेतीचा प्रवास.

जमीन माळरानाची असल्यानं दोघांनी जमिनीची चांगली मशागत केली. त्यात सेंद्रिय खते मोठ्या प्रमाणावर घालून जमीन तयार केली. या तीन एकर क्षेत्रात तीन प्लॉट असून 20 गुंठे, एक एकर आणि तिसरा दीड एकराचा आहे.

मिरची लागवड

त्यांनी सांगली जिल्ह्यातून इंद्रा आणि 1865 अशा दोन जातीची ढोबळी मिरचीची तयार रोपे आणली. इंद्रा जातीची दहा हजार आणि 1865 जातीची पंचवीस हजार अशी एकूण 35 हजार रोपांची 9 ते 11 जानेवारीच्या दरम्यान लागवड केली.

पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरुन, अडीच फुटी बेडवर सव्वा फुटाला एक याप्रमाणे झिगझ्याग पद्धतीनं रोप लावली. सुरुवातीच्या काळात कीटकनाशक, बुरशीनाशक आणि विद्राव्य खतांच्या आळवण्या घेण्यात आल्या. कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी चार ते पाच दिवसाच्या अंतराने फवारण्या केल्या.

कुमार पाटील यांचं शिक्षण बी. कॉम पर्यंत झालं आहे. त्यांनी सव्वा दोन एकर जमिनीपैकी एक एकरात ऊस आणि उर्वरित क्षेत्रात भात, वरणा,  दोडका, काकडी अशा भाजीपाल्याची लागवड असते. तर प्रभाकर पाटील यांचे शिक्षण दहावीपर्यंतचे असून दोन एकर पैकी एक एकरात ऊस आणि उर्वरित क्षेत्रात वर्षभर भाजीपाला असतो.



पहिल्या तोड्याचं उत्पादन

फळांचं वजन रोपांना पेलविण्यासाठी तारकाठी करण्यात आली. एकसष्ठाव्या दिवशी फळांची काढणी सुरु झाली. सुरवातीच्या पहिल्या तोड्यात 7 टन मिरचीचं उत्पादन मिळालं.

साधारणपणे आठएक दिवसाच्या अंतराने काढणी करण्यात येते. आतापर्यंतच्या चार तोड्यात 45 टन ढब्बू मिरचीचं उत्पादन मिळालं आहे.

दिल्ली , मुंबई , हैद्राबाद या ठिकाणी मिरची पाठविण्यात येते. आतापर्यंत किलोला सरासरी 15 रुपयाचा दर मिळाला आहे. यातून साडे  सहा लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे दोघांनी आतापर्यंत मिळून केलेला पाच लाख रुपयाचा खर्च निघाला आहे.

या तीन एकरात 35 हजार रोपांची संख्या असून, प्रति रोप कमीत कमी सात किलोचं उत्पादन त्यांना अपेक्षित आहे.  तीन एकरातून 250 टन मिरचीचं उत्पादन अपेक्षित आहे.

सध्याच्या 15  रुपये किलोच्या दराने साडे सदतीस लाख रुपये कमीत कमी अपेक्षित असून, येथून पुढे दरात वाढ झाल्यास अजून नफ्यात वाढ होणार आहे.

कुमार आणि प्रभाकर यांनी योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यामुळं, आज एका ढब्बू मिरचीचं 200 ते 300 ग्रॅम इतकं उत्पादन मिळत आहे.

एकट्याने असा मोठा प्लॉट करणं शक्य नसल्याचं प्रभाकर सांगतात. आम्हां दोघांमुळं हे यशस्वी करु शकलो. आता येथून पुढे अजून एकत्रित, हंगामी भाजीपाल्याची शेती करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

कुमार आणि प्रभाकर या दोन जिवलग मित्रांचा आदर्श घेऊन, जर सामूदायिक शेती केली, तर निश्चित फायदा होतो हेच यावरून दिसून येते.

VIDEO:


VIDEO: