GMC Nagpur : मेडिकलमध्ये येणारे 50 टक्के रुग्ण अत्यवस्थ, मनुष्यबळाची कमतरता गंभीर समस्या

एबीपी माझा वेब टीम   |  अक्षय गांधी   |  21 Sep 2022 06:17 PM (IST)

रुग्णालयात दाखल होणारे 50 टक्के रुग्ण शेवटच्या क्षणी पोहोचलेले असतात. अशा स्थितीतील रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांसाठी फारच आव्हानात्मक ठरते. अनेक वेळा वेळेवर सुविधा न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यूही होतो. 

file photo

नागपूरः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यावर्षी आपल्या स्थापनेचे 75 वे वर्ष साजरे करत आहे. या वाटचालीत अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. याचा लाभ रुग्णांनाही मिळत आहे. मात्र, विदर्भातील अन्य जिल्ह्यांसह महानगरपालिकेच्या रुग्णालयांची स्थिती मात्र होती तशीच राहिली. 

रुग्ण अत्यवस्थ झाला की, शेवटच्या क्षणी मेडिकलला रेफर करण्याची परंपरा आजही कायम आहे. मेडिकलच्या आकस्मिक विभागात दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण शेवटच्या क्षणीच पोहोचलेले असतात. अशा स्थितीतील रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांसाठी फारच आव्हानात्मक ठरते. अनेक वेळा वेळेवर सुविधा न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यूही होतो. 

एम्सच्या निर्मितीनंतर मेडिकलवरील रुग्णांचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात मात्र उलटेच घडले. एम्सची ओपीडी 1800, ते 2000 वर पोहोचली. पण, मेडिकलच्या ओपीडीत आजही अडीच हजाराच्यावर रुग्ण रोज येत आहेत. रुग्णांचा भार वाढलेलाच असल्याने बरेचदा अडचणी येत आहेत. 

मनुष्यबळाची कमतरता गंभीर समस्या

गंभीर स्थितीत येणाऱ्या रुग्णाला तातडीने डॉक्टरांच्या मदतीसह ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा आयसीयूची गरज भासते. मेडिकलमध्ये एकूण 221 व्हेंटिलेटर आहेत. त्यापैकी 187 कार्यरत स्थितीत आहेत. तर, 17 नादुरुस्त असून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. मेडिसिनच्या आयसीयूमध्ये असणारे 25 बेड नेहमीच भरलेले असतात. याशिवाय वॉर्ड 50 हा मुलांचा आयसीयू आणि वॉर्ड क्रमांक 51 हा शस्त्रक्रिया विभागाचा आयसीयू आहे. सर्व आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर आवश्यक आहेत. यासोबतच व्हेंटिलेटर लावलेल्या रुग्णावर देखरेख ठेवण्यासाठी मनुष्यबळाचीही गरज असते, ती कमी असते. व्हेंटिलेटरवर पूर्वीपासून रुग्ण असल्यास ते काढता येत नाही. यामुळे व्हेंटिलेटर उपलब्ध नसलेल्या स्थितीत नवीन रुग्ण आल्यास अडचण निर्माण होते.

उपलब्ध सुविधा

  • 221 व्हेंटिलेटर
  • 187 कार्यरत
  • 25 बेडचे मेडिसिन आयसीयू
  • 2,500 च्यावर रोजची ओपीडी

मेडिकलमध्ये रेफर केलेल्या आणि गंभीर स्थितीत पोहोचलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सध्याच्या यंत्रणेवर अचानक दबाव वाढतो. तर मनुष्यबळ केवळ 1,000 बेडनुसारच उपलब्ध आहे. त्यामुळेच काही वेळा गंभीर रुग्णांनाही तत्काळ सुविधा मिळण्यास विलंब होतो. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल

इतर महत्त्वाच्या बातम्या

Naxal Movement : जनआंदोलनातून नक्षली शहरी भागात प्रभाव वाढवण्याच्या तयारीत? सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याची शक्यता

आज मुख्यमंत्री दिल्लीत, आता ते महाराष्ट्रासाठी गेलेत की, स्वतःसाठी? आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंना चिमटा

Published at: 21 Sep 2022 06:17 PM (IST)
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.