Naxal Movement : कृषी कायद्याच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनातील हिंसा असो किंवा अग्निवीर योजनेसंदर्भात झालेला हिंसाचार...तरुणांची माथी भडकावून देशात अस्थैर्य निर्माण  केल्याची कबुली आता खुद्द नक्षलवाद्यांनी दिली आहे. एवढेच नाही भविष्यात अशा आंदोलनात आमचे लोकं घुसखोरी करतील असा दावा ही माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने एका पत्राच्या माध्यमातून केला आहे. भविष्यात नक्षलवादी ते सैन्याच्या अग्नीवीर भरती प्रक्रियेच्या किंवा इतर पोलीस भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सैन्यात किंवा पोलीस दलात शिरून गोपनीय माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात ही आहेत का असा संशय सेंट्रल कमिटीच्या पत्रकाच्या माध्यमातून झाला आहे. 


भाकप माओवादी या प्रतिबंधित संघटनेच्या स्थापनेचे 18 वर्ष पूर्ण होत असताना नक्षलवाद्यांच्या ( माओवाद्यांच्या ) सेंट्रल कमिटीने एक पत्रक काढले आहे. त्यात दिल्ली येथील हिंसक शेतकरी आंदोलनात यशस्वीपणे घुसखोरी केल्याचे नक्षलींनी म्हंटले आहे. सेंट्रल कमिटीच्या नक्षली नेत्यांनी या पत्रकात आपल्या कॅडरला अशाच प्रकारच्या आंदोलनात खुले व गोपनीय पद्धतीने घुसायचे आदेश ही दिले आहेत. भारतीय सैन्याच्या अग्निवीर योजनेच्या विरोधात भडकलेल्या आंदोलनातही माओवादी सक्रिय होते असे या पत्रकात म्हंटले आहे. नक्षलींच्या 'युनायटेड फोरम' म्हणजेच संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून माओवाद्यांनी गोपनीय मार्गाने इतर अनेक आंदोलनात शिरकाव केल्याची माहिती ही या पत्रकातून दिली आहे.


22 पानी या पत्रकात नक्षलींच्या सेंट्रल कमिटीने नक्षलवाद्यांनी आणि त्यांच्या पाठिराख्यांची वर्षभर देशातल्या विविध भागात केलेल्या हिंसक कारवायांचा लेखाजोखा तर मांडला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात गाजलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणात तुरुंगात बंद असलेल्यांच्या सुटकेसाठी आंदोलन केल्याची माहिती ही सेंट्रल कमिटीने दिली आहे. शिवाय देशातील विविध मोठ्या उद्योग समूहांना औद्योगिक कामांसाठी मिळणाऱ्या जमिनी, खाणी आणि इतर सवलतीच्या विरोधात हिंसक आंदोलन यशस्वीरित्या करता येईल... तसेच धार्मिक अल्पसंख्यांक आणि महिलांवरील अत्याचार वाढल्याच्या मुद्द्यावरही असेच आंदोलन उभे करता येईल असा भविष्याच्या रोडमॅपचा उल्लेख ही या पत्रकात आहे.


सैन्य, पोलीस दलात नक्षली शिरकाव करणार?


भविष्यात अग्निवीर योजना, पोलीस किंवा इतर सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नक्षलवादी सैन्य, पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये घुसण्याचा ही प्रयत्न करू शकतात अशी शंका ही या पत्रकाच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षल विरोधी पथकाचे उपमहानिरीक्षक (DIG) संदीप पाटील यांच्या मते नक्षलवादी अग्निवीर किंवा पोलिसांच्या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सैन्य किंवा पोलीस दलात शिरण्याचा प्रयत्न करू शकतात.  नक्षलवाद्यांना हे चांगल्याने माहित आहे की सैन्य आणि पोलिसांशी त्यांचा लढा कायम सुरू राहणार आहे. त्यामुळे भविष्यात सैन्यदल किंवा पोलीस यांच्याशी लढा देताना नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांच्या गोपनीय माहितीची आवश्यकता राहील आणि त्याच निमित्ताने ते सध्या भरती प्रक्रियेचे माध्यमातून या दलांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू शकतात. असे असले तरी सुरक्षा दल आणि पोलीस आधीच दक्ष आहे असे ही संदीप पाटील म्हणाले