मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेची खरीप हंगाम 2018 ची नोंदणी करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. अर्ज करण्याची मुदत उद्या संपत असल्याने शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, बँक, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडून अधिसूचित पिकांचा विमा हप्ता भरून नोंदणी करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज आपले सरकार सेवा केंद्र आणि विमा कंपन्या 31 जुलै 2018 ला रात्री 12 वाजेपर्यंत पोर्टलवर अपलोड करू शकतात.

त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि जिल्हा बँकांमार्फत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपला विमा हप्ता रोख/ऑनलाईन/डिमांड ड्रॉफ्टद्वारे 31 जुलै 2018 पर्यंतच बँकेकडे जमा करता येईल.

शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपन्यांना पाठवण्याच्या अंतिम तारखा

ग्रामिण बँका, व्यावसायिक बँका, खाजगी बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी 9 ऑगस्ट अंतिम तारीख आहे.

प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून जिल्हा सहकारी बँकांकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी अंतिम तारीख 9 ऑगस्ट आहे.

जिल्हा सहकारी बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी 23 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे.

31 जुलैनंतर बँकांमार्फत विमा पोर्टलवर शेतकऱ्यांचा विमा तपशील भरता येणार आहे. ही सुविधा फक्त बँक आणि जिल्हा सहकारी बँकांसाठीच उपलब्ध असेल.

पोर्टलवर गावांची नावं मिळत नसतील तर काय?

दरम्यान, पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नसतील, पण राज्य शासनाने त्या गावांचे महसूल मंडळ अधिसूचित केलेली असतील तर अशा गावांतील शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकांनी स्वीकारावा आणि वर नमूद केलेल्या तारखांनुसार विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवावा, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकांनी विमा हप्ता 31 जुलै 2018 रोजीच त्यांच्या खात्यातून कपात करून घ्यावा. प्रस्ताव अपलोड करण्याचे काम 23 जुलै 2018 च्या शासन निर्णयातील तारखांप्रमाणे करता येईल. यासंबंधित सर्व सूचना कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत.