मुंबई : प्रेम ही भावनाच मनात तरंग उमटवणारी आहे. आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमात पडतोच. 'आपलं कुणीतरी असणं'… त्या आपल्या प्रेमाच्या माणसासाठी काहीही करणं, त्यात स्वत:ला विसरून जगणं, या साऱ्या गोष्टींतून मोरपंखी प्रेमाच्या नात्याचा रेशमीबंध आपसूकच विणला जातो. असं म्हणतात, 'प्रेमाला वय नसतं, प्रेमाला रंग नसतो, प्रेमाला फक्त भावनेचा गंध असतो'. प्रेमभावनेचा हा वेगळा रंग आणि त्या नात्यातील नाजूक रेशीमबंध उलगडून दाखवणारा 'प्रीतम' हा मराठी चित्रपट 19 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'अॅड फिल्ममेकर' दिग्दर्शक सिजो रॉकी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विझार्ड प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'प्रीतम' चित्रपटाची निर्मिती फैजल नितीन सिजो यांनी केली आहे.


प्रेम ही भावना कालातीत आहे. पण त्याचा आविष्कार वेगवेगळा असू शकतो. प्रेमाचे सूर कधी आणि कोणासोबतही जुळू शकतात. 'प्रीतम' चित्रपटातील कहाणी अशाच दोन प्रेमीयुगलांची आहे. सौंदर्याचे काही एक निकष आपल्याकडे ठरले आहेत. पण त्यापलीकडे प्रेमाचा खरा रंग त्यातील सच्चेपणाचा अनोखा बंध उलगडणारी हृदयस्पर्शी प्रेमकहाणी म्हणजे 'प्रीतम' हा चित्रपट. रंगरूपापलिकडचा प्रेमभावनेचा वेगळा अर्थ प्रीतम आणि सुवर्णाच्या प्रेमकथेतून हा चित्रपट मांडतो.



कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर बहरणाऱ्या या प्रेमकथेत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही फ्रेश जोडी पहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. वाटा-आडवाटांवरचे निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण आणि मनाचा ठाव घेणारे सागरकिनारे अशी कोकणातील विविध मनोहारी लोकेशन्स 'प्रीतम' चित्रपटातून दिसणार आहेत. सोबत सुमधूर गीतसंगीताचा सुरेल नजराणा या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे. शुक्रवारी 19 फेब्रुवारीला 'प्रीतम' आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :