Urmilayan Marathi Play Review : जेव्हा जेव्हा रामायणाचा उल्लेख होतो तेव्हा फक्त प्रभू श्रीराम, सीता आणि बंधुप्रेमासाठी सर्व प्रकारचा त्याग करणाऱ्या लक्ष्मणाचा उल्लेख होतो. मात्र बंधुप्रेमासाठी लक्ष्मणाने पत्नी उर्मिलेला सोडलेले असते, तिच्याबद्दल काहीही उल्लेख होत नाही किंवा तिच्याबद्दल जास्त काही लिहिलेलेही नाही. नवीनच लग्न झालेले असताना पती तिला काहीही न सांगता बंधु श्रीराम आणि वहिनी सीतेसोबत 14 वर्षांच्या वनवासाला जातो. जाताना पत्नीशी साधे दोन शब्दही बोलत नाही. लक्ष्मण परत येईपर्यंतची 14 वर्षे उर्मिला कशी राहते, तिच्या मनात काय भाव-भावना येत असतात याबाबत फार कमी आणि अभावानेच लिहिण्यात आलेले आहे. खरे पाहिले तर राम, सीता आणि लक्ष्मणापेक्षा उर्मिलेचा त्याग मोठा आहे असे म्हणण्यास स्पष्टपणे वाव आहे.
राम, सीता माता कैकेयीच्या मागणीमुळे 14 वर्षांच्या वनवासाला जातात, उर्मिलेला मात्र लक्ष्मण गृहित धरतो आणि तिला सोडून राम सीतेबरोबर जातो. उर्मिलेची हीच कथा सुमुख चित्र निर्मित आणि अनामिका प्रकाशित संगीत, नृत्यनाट्याच्या मांडणीतून उर्मिलायन या नाटकात सादर करण्यात आलेली आहे. हे नाटक रंगमंचावर आणण्याचे धाडस दाखवणाऱ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे.
सीतेची लहान बहीण असलेली उर्मिला शस्त्रांसह राज्यशास्त्राच्या अभ्यासतही पारंगत असते. सीतेच्या स्वयंवरासाठी राम लक्ष्मण मिथिलेत आलेले असताना उर्मिला लक्ष्मणाला मनोमन वरते. मोठी बहीण सीतेप्रमाणे आपलेही स्वयंवर व्हावे असे उर्मिलेला वाटत असते. मात्र सीतेच्या विवाहासोबतच उर्मिला आणि तिच्या अन्य बहिणींचेही दशरथ पुत्रांबरोबर विवाह केले जातात आणि स्वयंवराचे स्वप्न पाहाणारी उर्मिला लक्ष्मणाची पत्नी म्हणून अयोध्येला येते. तिच्या सर्व इच्छा आकांक्षाचे दमन होण्यास येथूनच सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लक्ष्मणही आपल्या नववधूला अयोध्येतच सोडतो.
वडिलधाऱ्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून उर्मिलेला अयोध्येत ठेवल्याचे लक्ष्मण म्हणतो. पुरुष स्त्रीला गृहित धरतात, तिच्या मनाचा विचार करीत नाहीत हे यातून समोर येते आणि या नाटकात यावरच भर टाकलेला आहे. राम, सीता, लक्ष्मण देव झाले पण पतीविना १४ वर्षे राहाण्याचा त्याग करणारी उर्मिला देव झाली नाही.
लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नाटकाचे लेखन खूपच प्रभावी केले आहे. लेखन उत्कृष्ट असल्यानेच ते रंगमंचावरही तितक्याच ताकदीने सादर करण्यात आले आहे. सुनिलने नाटकाची दोन भागात मांडणी केली आहे. पहिल्या भागात उर्मिलेची लग्नाअगोदरची कथा त्याने मांडली आहे तर दुसऱ्या भागात पतिविना राहाणाऱ्या, पतिवर रागावलेल्या आणि पतीने काहीही न विचारता अंगावर टाकलेल्या जबाबदारीचे ओझे अंगावर बाळगणाऱ्या उर्मिलेची कथा सादर केली आहे. पहिल्या भागातील उर्मिलेच्या कथेमुळे उर्मिला नक्की कोण होती आणि कशी होती हे समोर येते. संगीत आणि नृत्याच्या माध्ममातून सुनिलने उर्मिलेची कथा अत्यंत उत्कृष्टरित्या रंगमंचावर सादर केली आहे.
या नाटकाला आणखी उंचीवर नेण्याचे काम उर्मिलेची भूमिका करणाऱ्या निहारिका राजदत्तने केले आहे. उर्मिलेची भूमिका ती अक्षरशः जगली आहे. नवथर बालिका के घरातील ज्येष्ठांची काळजी घेणारी सून हा प्रवास तिने खूपच प्रभावीपणे दाखवला आहे. वनवासाला गेलेला पती परत येणार म्हणून तयारी करणारी उर्मिला पती येत नाही हे कळताच ज्या प्रकारे उन्मळून पडताना आणि १४ वर्षानंतर पती परत आल्यानंतर त्याला थेट प्रश्न विचारणारी उर्मिला प्रेक्षकांच्या मनात घर करते. पुढे-मागे उर्मिलाबाबत चर्चा झाली तर त्यासाठी निहारिकाचे नाव प्रकर्षाने घेतले जाईल इतक्या ताकदीने तिने ही भूमिका साकारली आहे.
लक्ष्मणाच्या भूमिकेत असलेल्या अमोल भारती यानेही कमाल केली आहे. बंधुप्रेमामोटी पत्नीला सोडून जाताना त्याच्या मनात काय कालवाकालव झाली असेल हे त्याने चांगल्या प्रकारे दाखवले आहे. 14 वर्षानंतर परत आल्यानंतर पत्नीकडून त्याची अपेक्षा आणि त्यानंतर तिच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्याची झालेली दमछाक त्याने चांगली दाखवली आहे. अन्य कलाकारांमध्ये सीता (कल्पिता राणे)नेही उर्मिलेच्या मोठ्या बहिणीची खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. दोन्ही बहिणींमधील प्रेम, उर्मिलेला समजावण्याचे प्रसंग कल्पिताने चांगले साकारले आहे. भरत (अजय पाटील), धनू (पूजा साधना) यांच्यासह शुभम बडगुजर, प्रणव चव्हाण,
दिवेश मोहिते, पराग सुतार, सोहम पवार, प्रियांका अहिरे, सुप्रिया जाधव, शिवानी मोहिते, निकिता रजक, मृणाल शिखरे, श्रावणी गावित यांनी अन्य भूमिकांमध्ये चांगली साथ दिली आहे.
नाटकाच्या विषयाला साजेसे, अनुरूप असे नेपथ्य अरुण राधायण यांनी तयार केले आहे तर या संगीतमय नाटकाला योग्य आणि कथा पुढे नेईल असे असे संगीत निनाद म्हैसाळकरने दिले आहे. सुजय पवार आणि ऋचा पाटील यांचे नृत्य दिग्दर्शनही वाखाणण्यासारखे आहे. वेशभूषा मंदार तांडेल तर रंगभूषा उदयराज तांगडीची. साहस दृश्ये सिद्धार्थ आखाडेची आहेत. प्रसंगांना अनुरूप अशी प्रकाशयोजना चेतन ढवळे यांनी केली आहे.
उर्मिलाची संगीत, नृत्यात्मक कथा रंगमंचावर आणण्याचे धाडस दाखवणारे निखिल जाधव यांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या नाटकामुळे या संपूर्ण टीमकडून अपेक्षा वाढल्या असून यापुढेही ही टीम वेगवेगळ्या विषयांवरील उत्कृष्ट नाट्यनिर्मिती करील अशी अपेक्षा आहे.