Evalese Rop : ज्येष्ठ लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे (Sai Paranjpye) जवळ जवळ 13 वर्षांनी पुन्हा एकदा ‘इवलेसे रोप’ (Evalese Rop) या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीकडे वळल्या आहेत. 2010 मध्ये सई परांजपे यांचे 'सख्खे शेजारी' हे नाटक नव्या संचात सादर झाले होते आणि आता सई परांजपे यांचे 'इवलेसे रोप' रंगमंचावर आले आहे. 'नातं पिकलं की अधिक गोड होतं' या टॅगलाईनने आलेल्या या नाटकात नेहमीप्रमाणेच निपुत्रिक वृद्ध दाम्पत्याची कथा सादर करण्यात आलेली आहे. आजवर अशा प्रकारच्या कथांवर आधारित अनेक नाटके रंगमंचावर आलेली आहेत. अशा नाटकांचा गाभा एकच असतो, फक्त त्याचे सादरीकरण आणि थोड्या फार गोष्टी बदललेल्या असतात. कधी अशा दाम्पत्याची मुले परदेशात असतात, कधी लग्नानंतर वेगळी राहायला गेलेली असतात तर कधी अपघातात मृत्युमुखी पडलेली असतात. मग त्यांच्या जीवनात कोणी तरी येतात आणि त्यांचे जीवन फुलवतात. सई परांजपे यांच्या या नाटकात नावाप्रमाणेच 'इवलेसे रोप' हे मध्यवर्ती भूमिकेत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
'इवलेसे रोप' कसं आहे?
माधव (मंगेश कदम) (Mangesh Kadam) आणि भानुमती (लीना भागवत) (Leena Bhagwat) हे आजारांनी ग्रस्त असलेलेले 80 वर्षीय वृद्ध दाम्पत्य जमेल तसे जीवन जगत असतात. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला असतो. माधव थोडा भ्रमित झालेला असतो तर भानुमती मणक्याच्या आजाराने त्रस्त असते. दोघही जीवन जगत नसतात तर जीवन पुढे ढकलत असतात. वयोमानामुळे माधवला सतत जुन्या आठवणींचे भास होत असतात. तशा स्थितीत भानुमती स्वतःचे आजारपण सांभाळत माधवला सांभाळण्याचे काम करीत असते. त्यातच एक दिवस माधव एक गुपित भानुमतीकडे उघड करतो आणि त्यांच्या शांत संसारात वादळ निर्माण होते. पण लवकरच ते वादळ शांत होते.
त्यांच्याच सोसायटीत एक तरुण दाम्पत्य जगन्नाथ (मयुरेश खोले) आणि वैशाली (अनु्का गीते) राहायला आलेले असते. जग्गी आणि वैशाली यांना काही दिवसांसाठी महाबळेश्वरला जायचे असते. त्यामुळे घरातील एक रोपटे हे दोघे माई आणि बापू म्हणजेच माधव आणि भानामतीच्या घरी आणून ठेवतात. ते रोप या दोघांच्या जीवनात विरंगुळा आणते, त्यांना त्याचा लळा लागतो. एखाद्या मुलाप्रमाणे ते त्या रोपावर प्रेम करू लागतात. अर्थात त्यामागेही एक कारण असते. ते कारण काय ते रंगमंचावरच पाहणे उचित ठरेल.
लीना भागवत-मंगेश कदम पुन्हा एकत्र
'आमने सामने' नाटकानंतर लीना भागवत आणि मंगेश कदम पुन्हा एकदा या नाटकातून एकत्र आले आहेत. या नाटकातही दोघांनी अभिनयाची कमाल दाखवलेली आहे. मंगश कदम आणि लीना भागवत यांनी तरुणपणातील माधव आणि भानुमतीची भूमिकाही प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. दोन्ही भूमिकांमध्ये बदल दोघांनीही खूपच उत्कृष्टपणे दाखवलेला आहे. तरुणपणातील त्यांचा अल्लडपणा आणि वार्धक्यातील आजारपणामुळे झालेली स्थिती या दोन्ही गोष्टी खूपच चांगल्या प्रकारे रंगमंचावर सादर केलेल्या आहेत. अत्यंत कमी वेळात गेटअप बदलून भूमिका साकारणे सोपे नसते पण या दोघांनी ते लिलया करून दाखवले आहे.
मयुरेश आणि अनुष्का या दोघांनीही क्लिक नाटकात यापूर्वी काम केलेले आहे. त्या नाटकातील काम बघूनच त्यांची या नाटकासाठी निवड करण्यात आली. या दोघांनी आपापल्या भूमिका चांगल्या पद्धतीने साकारल्या आहेत. अक्षय भिसेनेही छोटीशी भूमिका साकारली आहे.
सई परांजपे यांनी लेखन, दिग्दर्शन करत व्यावसायिक नाटके, बालरंगभूमी, चित्रपट, माहितीपट, लघुपट अशा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘स्पर्श’ तसेच ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’,‘दिशा’, ‘पपिहा’, ‘साज’ यांसारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि अनेक दर्जेदार नाटके सई परांजपे यांनी दिली आहेत. इवलेसे रोप हे त्यांचे नवे नाटक त्यांच्या शैलीला अनुरूप असेच आहे. प्रवीण मुळे यांनी नाटकाला साजेसे नेपथ्य केले आहे. माई-बापूच्या घराचे त्यांच्या तरुणपणातील घर आणि वार्धक्यातील घर त्यांनी चांगल्या पद्धतीने दाखवले आहे.