2 Vajun 22 Minitani Marathi Theatre Play Review: लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांची जोडी प्रचंड कमालीची आहे आणि रंगमंचावर या जोडीची कमाल नेहमीच दिसून येते. अ परफेक्ट मर्डर, यू मस्ट डायनंतर ही जोडी पुन्हा एकदा रंगमचांवर प्रेक्षकांना रहस्य रोमांचाचा अनुभव देण्यासाठी सिद्ध झाली आहे. दोन वाजून 22 मिनिटांनी असे नाव असलेल्या या नाटकाचा मुबंईतील शुभारंभाचा प्रयोग रविवारी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे झाला. विशेष म्हणजे या नाटकाचा पहिला प्रयोग मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये 8 डिसेंबरलाच करण्यात आला होता. शुभारंभाचा प्रयोग महाराष्ट्राबाहेर करण्याचा निर्मात्यांचा निर्णय अत्यंत स्तुत्य असेच म्हणायला पाहिजे.
पडदा उघडतो तेव्हा आपल्याला एक भव्य बंगला दिसतो आणि एक तरुणी जमिनीवर बसून काही तरी काम करीत असते, त्याचवेळी घड्याळात 2 वाजून 22 मिनिटे होतात आणि रंगमंचावर रहस्याला सुरुवात होते. भुताटकी असल्याचे चिन्ह दर्शवणारी ही सुरुवात शेवटपर्यंत कायम राहते. केतन (अनिकेत विश्वासराव) आणि रुतिका (गौतमी देशपांडे) मुंबई सोडून पाचगणीला एक जुना बंगला विकत घेऊन त्याचे आधुनिक बंगल्यात रुपांतर करतात आणि तेथे राहायला जातात. त्याच रात्री बंगल्यात केतनची मैत्रीण सोनाली (रसिका सुनील) पती दुर्गेश (प्रियदर्शन जाधव) सोबत येते. केतन हा खगोलशास्त्रज्ञ असतो आणि नेहमी ताऱ्यांची रहस्ये शोधण्यासाठी बाहेर जात असतो. यावेळीही तो ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी स्पिती येथे जाऊन आलेला असतो. केतन आणि रुतिकाला काही महिन्यांची एक लहान मुलगीही असते. रुतिकाने मुलीचा सांभाळा करण्यासाठी नोकरी सोडलेली असते. सौनाली मानसोपचार तज्ञ असते तर दुर्गेश प्लम्बिगच्या व्यवसायात असतो.
केतन परत आल्यानंतर रुतिका घरात भुताटकी असल्याचे त्याला सांगते, मात्र केतन स्वतः खगोलप्रेमी असल्याने त्याचा यावर विश्वास बसत नाही. रुतिकाला भास होत असतील असे सांगून तो तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला यात यश येत नाही. यातच सोनाली आणि दुर्गेशही भुतावर विश्वास असल्याचे सांगतात त्यामुळे रुतिकाचा घरात भूत असल्याबद्दल ठाम विश्वास बसतो. वेळोवेळी याचा अनुभव रुतिकाला येत असतो आणि काही काळानंतर सगळ्यांनाच भुताचा अनुभव येतो. ज्या व्यक्तीकडून घर घेतले त्याचा आत्मा घरात फिरत असल्याचे रुतिकाला वाटत असते. हा आत्मा त्यांच्या छोट्या मुलीला इजा करील अशी भीतीही रुतिकाला वाटत असते त्यामुळे ती मुलीला आत्म्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असते. आणि मग नाटक शेवटाकडे जाते तेव्हा प्रेक्षकांना अनपेक्षित असा धक्का बसतो. हा धक्का काय आहे ते रंगमंचावर पाहाण्यातच मजा आहे.
अनिकेत विश्वासरावने खगोलशास्त्रज्ञ केतनची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे. भुताच्या गोष्टीला विरोध करीत असतानाचा केवळ पत्नीच्या इच्छेपोटी आणि तिच्यावरोली प्रेमापोटी प्लँचेट करण्यास तयार असलेल्या पतीची त्याची भूमिका कमालाची आहे. मुलीला भुतापासून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पतीला घरात भूत आहे हे पटवून देण्यासाठी आकाश-पाताळ एक करणाऱ्या रुतिकाची भूमिका गौतमी देशपांडे कमालीच्या सफाईदारपणे साकारली आहे. नुकत्याच बाळंत झालेल्या आईची देहबोली गौतमीची चांगल्या प्रकारे पकडली आहे.
मानसोपचार तज्ञ झालेल्या सोनालीची भूमिका रसिका सुनीलने साकारताना व्यक्तिमत्वाला दिलेली रहस्याची जोड मस्तच आहे. दुर्गेशच्या भूमिकेत प्रियदर्शन जाधवने कमाल केली आहे. विनोदाचे त्याचे टायमिंग किती चांगले आहे हे त्याने पुन्हा एकदा यात सिद्ध करून दाखवले आहे. विनोदासोबतच गंभीर दृश्यातही तो कमाल करतान दिसतो.
मात्र नाटक पाहाताना तेच तेच सतत समोर येत असल्याने प्रेक्षक थोडा कंटाळतो आणि कधी एकदा 2 वाजून 22 मिनिटे होतात याची वाट पाहात बसतो. हा कंटाळा थोडा कमी केला असता तर नाटक आणखी चांगल्या प्रकारे जमून आले असते.
इंग्रजी कथेवर आधारित नीरज शिरवईकरने रहस्यमय नाटकाची गुंफण चांगल्या प्रकारे केली आहे. मध्ये-मध्ये प्रियदर्शन जाधवचे विनोद प्रेक्षकांना रहस्यापासून दोन चार क्षण हसवतात आणि टेंशन काही प्रमाणात कमी होतात परंतु लगेचच लेखक प्रेक्षकांच्या रहस्याच्या वाटेकडे घेऊन जाते. रहस्यमय नाटके लिहिण्यात नीरज शिरवईकरचा हातखंडा आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नाटकाचे नेपथ्यही निरजनेच केले आहे. नाटकाच्या विषयाला संपूर्णपणे अनुरूप असे नेपथ्य आहे. नाटकाचा नायक खगोलशास्त्रज्ञ असल्याने दुर्बिणीची केलेली सोय तो नेपथ्याबाबत किती विचार करतो ते दाखवणारी आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याबाबत काही सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही. वर्गात नेहमी पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याबाबत जसे काहीही बोलण्यास शब्द कमी पडतात त्याचप्रमाणे केंकरे यांच्या दिग्दर्शनाबाबत बोलण्यासाठी शब्द कमी पडतात. रहस्य असो वा कौटुंबीक, विनोदी नाटक असो विजय केंकरेंचा स्पर्श त्या नाटकाला झाला की नाटक झळाळून उठते आणि 2 वाजून 22 मिनिटानीचेही तेच झाले आहे.
खरे तर या नाटकाची निर्मिती अगोदर महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे करणारे होते. आदिनाथ कोठारे नायक केतनची भूमिकाही साकारणार होता. परंतु काही कारणामुळे कोठारे या नाटकापासून दूर केले आणि अस्मय थिएटर्स, प्रवेश क्रिएशन्सने या नाटकाची निर्मिती केली आहे.