Pushpa The Rise Movie Review : 2004 साली अल्लू अर्जुनचा 'आर्या' सिनेमा आला होता. त्यातलं "आ आंटे आमलापूरम" हे गाणं तेव्हा लग्नाच्या वरातीत वाजायचं. गाण्याचा एक शब्दही कळत नसताना लोक झिंगून नाचायचे, तेव्हा आश्चर्य वाटायचं. या गाण्यानं तेलुगू सिनेमाला अपार प्रसिद्धी मिळाली. भाषा कळत नसूनही अडीच तीन तास सिनेमा बघायला लावलं ते 'आर्या'नं. अल्लू अर्जुन तेव्हापासून कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेकांचा फेव्हरेट बनला. अवघ्या पंचविशीतल्या देवी श्री प्रसाद यांचं संगीत, वयाच्या पस्तिशीत स्वत:चं काही करू पाहणारे सुकुमार यांचं दिग्दर्शनातलं पदार्पण आणि अवघ्या एकविस वर्षाच्या अल्लू अर्जुनचा अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स. या तरुणाईच्या सिनेमानं समकालिन तरुणाईला तेलुगू सिनेमाशी जोडलं. आज 17 वर्षांनंतर याबद्दल लिहिण्याचं कारण म्हणजे नुकताच रिलिझ झालेला 'पुष्पा'. या तिघांनी पुन्हा एकदा एकत्र येत पुष्पाच्या निमित्तानं थीएटर दणाणून सोडलंय.
'तीन तिगाडा काम बिगाडा' अशी आपल्याकडे म्हण आहे. पण अल्लू अर्जुन, सुकुमार आणि देवी श्री प्रसाद यांनी ही म्हण खोटी ठरवली. दोन वर्षांनंतर थीएटरला गेल्यावर अल्लू सरांनी नाराज नाही केलं. मला आठवतं 'केजीएफ'च्या वेळीही अशीच धमाल थीएटरमध्ये आली होती. अल्लू अर्जुनचे अॅक्शन सीन कमाल होते. आंध्रप्रदेशमधल्या घनदाट शेषाचलमच्या जंगलातल्या लाल चंदनाच्या तस्करांची ही कहाणी आहे. या जंगलाचा राजा बनलाय 'पुष्पा.. पुष्पराज'. लाल चंदनाच्या काळ्या धंद्यात पुष्पाचे प्रतिस्पर्धी खूप आहेत, या सर्वांच्या चेहर्यावर मित्रत्वाचे बुरखे आहेत. पण वेळ आल्यावर ते एकमेकांचा जीव घ्यायला कायम पुढे असतात. पुष्पा कोण आहे? कुठून आलाय? तो या अवैध धंद्याकडे कसा वळला? हे सर्व सविस्तर कथेसोबत कळत जातं. मारधाडसोबत रोमान्स आणि खास डान्स स्टेप्स ही अल्लू अर्जुनची खासियत आहे. हिंदी व्हर्जनमध्ये डायलॉगही उत्तम झालेत. विशेष म्हणजे, अल्लू अर्जुनसाठी श्रेयस तळपदेनं आवाज दिलाय. अल्लूच्या पर्सनालिटीला तो आवाज बर्यापैकी शोभलाय. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनची जोडी सोबतीला देवी श्री प्रसाद यांच्या सुश्राव्य संगीतानं या सिनेमाला देखणं केलंय. एका आयटम सॉन्गमध्ये तेलुगू लेडी सुपरस्टार समंथा दिसली आहे. या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची अशी की, रोमान्स, आयटम सॉन्ग हे कुठेही मधे घुसवले नाहीत. मूळ कथेसोबत हे सगळं घडत जातं, त्यामुळे दिग्दर्शक सुकुमार यांना टेन आऊट ऑफ टेन मार्क द्यायला पाहिजे. कोविडच्या निर्बंधांच्या काळात पाचशे सहाशे जणांना सोबत घेऊन या चित्रपटात जंगलात शुटिंग करणं एक मोठं आव्हान होतं. ही प्रचंड मेहनत आपल्याला हा सिनेमा बघताना प्रत्येक सीनमध्ये जाणवते. या काळात तीन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणं सोपं नाहीये. पण सर्व कलाकारांच्या दमदार अभिनयानं ते शक्य झालंय.
पुष्पा पार्ट 1 च्या शेवटाकडे आणि क्लायमॅक्सकडे जाताना एन्ट्री होते सुपरस्टार फहाद फासिलची. खाकी वर्दीत बाल्ड लूकमध्ये फहादने साकारलेला पोलीस अधिकारी भंवरसिंह शेखावत भाव खाऊन गेलाय. आतापर्यंत हा सिनेमा फक्त अल्लू अर्जुनचा होता. पण समोर त्याच तोडीचा अभिनेता फहाद फासिल आल्यानं दोघांची जुगलबंदी बघण्यासारखी आहे. यातला हिरो कोण आणि विलन कोण? हे प्रेक्षकांनी ठरवायचं. एका क्षणाला फहाद हा सिनेमा हायजॅक करतो की काय? असं वाटत असतांना शेवटचा सीन पुष्पा पार्ट 2 ची उत्सुकता वाढवून जातो. दुसऱ्या पार्टमध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुन विरुद्ध सुपर डूपरस्टार फहाद फासिल हा सामना रंगणार आहे. त्यामुळे पुष्पा पार्ट 2 ची वाट पाहावी लागेल.
अल्लू अर्जुन स्टाईलची रिअल अॅक्शन, जबरदस्त डायलॉग, फहाद फासिलची किलिंग लूक आणि अभिनय, रश्मिकाचा प्रेझेंस, दमदार कथानक, उत्तम दिग्दर्शन, देवी श्री प्रसाद यांचं मधूर संगीत, ग्राफिक डिझाईन्स आणि परफेक्ट कास्टिंगमुळे पुष्पा पार्ट 1 जमून आलाय. इंटरवल नंतर थोडा स्लो झालाय, पण क्लायमॅक्स अनेक सरप्राईज घेऊन येतो. त्यामुळे चुकवू नये असा सिनेमा.