Tikdam Movie Review : जर आपण वाईट सिनेमावर टीका केली तर चांगल्या सिनेमाची स्तुती करायची हिंमत असली पाहिजे. कलाकाराने वाईट अभिनय केला असेल तर टीकाही करावी. पण चांगले काम केल्यास त्याचे तोंडभरून कौतुक करायला हवं. जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकडम हा चित्रपट रिलीज झाला आहे. ना कोणतं प्रमोशन, ना कोणता आवाज-गडबड गोंधळ... मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाची चर्चा का नाही, असा प्रश्न मनात निर्माण होतो. चित्रपटाची टीम आपल्या ताकदीनुसार चित्रपट प्रमोट करत आहेत आणि त्यांनी हा चित्रपट लोकांपर्यंत न्यायला हवा. 


चित्रपटाची कथा काय?



ही कथा आहे एका छोट्या हिल स्टेशन सुखतलची. इथे प्रकाश म्हणजेच अमित सियाल आपल्या मुलांसोबत राहतो. एका छोट्या हॉटेलमध्ये काम करतो पण सुखतलमध्ये कमी पर्यटक असल्यामुळे ते हॉटेल बंद पडते. आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करायची असतात, त्यांना पिकनिकला घेऊन जायचे असते. त्यामुळे इतर काही ग्रामस्थांप्रमाणे  प्रकाशही शहरात जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतो. पण, त्याची मुले हे आपल्या वडिलांनी गाव सोडून जावू नये यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी मुले पर्यावरणावर काम करतात. जेणेकरून सुखतालमध्ये बर्फ पडावा आणि पर्यटकांची पावले पु्न्हा एकदा या ठिकाणी वळावी आणि रोजगार निर्मिती व्हावे, जेणेकरून त्यांचे वडील आणि इतरांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागू नये. आता, मुलांना यामध्ये यश मिळेल का, त्यांच्या आयुष्यात काय घडते हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. 


चित्रपट कसा आहे?


हा एक अतिशय सुंदर चित्रपट आहे जो तुम्हाला अनेक वेळा रडवेल, अनेक वेळा तो तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाईल, अनेक वेळा आठवणींचा पेटारा तुमच्यासमोर असा उघडेल की तुम्ही त्यात हरवून जाल. तुम्हाला असे वाटेल की तुमचे बालपण परत आले असते तर किती बरं होईल. लहानपणी तुम्ही वडिलांकडून खूप काही मागितले असे तु्म्हाला वाटू लागेल. 


हा चित्रपट अतिशय साधा आहे आणि हीच त्याची खासियत आहे, यात फारसे लाऊड ​​सीन्स नाहीत, आवाजाचा गोंगाट नाही. चित्रपट आपल्या गतीने चालतो आणि या चित्रपटासोबत तुम्हीही वावरता. काही गोष्टी तर्काने समजावून सांगितल्या आहेत. आपल्या आयुष्यात कुटुंब किती महत्त्वाचे आहे, त्याच्यापासून दुरावता कामा नये हे या चित्रपटात सांगण्यात आले आहे. 


कलाकारांचा अभिनय कसा आहे?


आतापर्यंत आपण अमित सियालला फक्त खडतर आणि उत्कट भूमिकांमध्येच पाहिले आहे. तो हा चित्रपट करू शकला असता आणि प्रकाशची व्यक्तिरेखा इतक्या सुंदरपणे साकारू शकला असता, कदाचित अमित सियालला हे माहित नसेल. पण हा चित्रपट अमित सियालच्या कारकि‍र्दीला कलाटणी देणारा ठरू शकतो.
त्याने साकारलेल्या भूमिकांपैकी ही आतापर्यंतची   सर्वोत्कृष्ट भूमिका आहे. त्याने आपल्या अभिनयाची, साकारलेल्या व्यक्तीरेखांची एक चौकट मोडली आहे. अमित  ज्या पद्धतीने वडिलांच्या भावना मांडतो, तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत तुमच्या वडिलांची आठवण येईल. अमित सियालचे संवादफेक आणि चेहऱ्यावरील भाव तुम्हाला नक्कीच भावतील. तुम्ही त्याच्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडाल. 


हा चित्रपट आणि हे पात्र अमितसाठी सिनेसृष्टीतील नवीन दरवाजे उघडतील असे वाटते. या चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्याने अप्रतिम काम केले आहे. अरिष्ट जैन, आरोही सौद आणि दिव्यांश दिव्येदी या तीन मुलांनी या चित्रपटात जीव ओतला आहे.  या तिघांनी विलक्षण पद्धतीने काम केले आहे. त्यांचा अभिनय पाहून ते खूप अनुभवी कलाकार आहेत असे वाटू शकते. याशिवाय इतर सर्व कलाकार अप्रतिम आहेत


दिग्दर्शन कसे आहे?


विवेक अंचलिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विवेक यांनीच पटकथा पंकज निहलानी सोबत लिहिली आहे. कथा अनिमेश वर्मा यांनी लिहिली आहे आणि हे तीन लोक या चित्रपटाचे तीन नायक आहेत. जर लेखन मजबूत नसेल तर कलाकारदेखील तेवढ्या ताकदीचे काम करू शकणार नाहीत.  हा चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत अव्वल आहे. विवेकने याचे दिग्दर्शनही अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे.