The Kerala Story:  एक गोष्ट सांगतो,  माझे एक गुजराती मित्र जे मोठे उद्योगपतीही आहेत. त्यांना एक देखणी मुलगी आहे. या मुलीचे त्यांच्याच इमारतीसमोरील एका गॅरेजमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम मुलाबरोबर प्रेम जमले. त्या मुलाशी लग्न करण्यासाठी ती मुलगी हट्ट धरून राहिली. तो मुलगा माझ्यावर खरे प्रेम करतो, त्याला पैशांची हाव नाही वगैरे वगैरे गोष्टी ती वडिलांना सांगत होती. मुलीची इच्छा पाहून अखेर वडिलांनी जास्त आडकाठी न घालता त्या दोघांचे लग्न लावून दिले. मात्र लग्नानंतर त्या मुलीचे डोळे उघडले, तिला काय आणि कसा त्रास झाला तो येथे लिहिण्यासारखा नाही. आणि सहा महिन्यातच त्या मुलीने त्या मुलासोबत घटस्फोट घेतला. अर्थात तिचे वडील उद्योगपती असल्याने त्यांनी हा घटस्फोट सहज कसा होईल? याकडे आवर्जून लक्ष दिले. त्या मुलीने नंतर एका गुजराती मुलासोबतच दुसरे लग्न केले आणि त्यांचा संसार सुखाने सुरु आहे.


गेल्या काही वर्षांपासून लव्ह जिहादचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जातोय. विविध संघटना याविरोधात मोर्चे काढून लव्ह जिहाद थांबवण्यासाठी कायदा आणा म्हणून मागणीही करीत आहेत. खरे तर आंतरधर्मीय विवाह ही भारतात फार मोठी गोष्ट नाही. आपल्या आजूबाजूलाही आंतरधर्मीय विवाह केलेली अनेक जोडपी दिसतात. आणि विशेष म्हणजे अनेक दशके त्यांचा संसारही सुखाने चाललेला असतो. मात्र काही आंतरधर्मीय विवाह हे वेगळ्या कारणांनी झालेले असतात आणि ते टिकतही नाहीत. वर दिलेले उदाहरण हे त्याचेच द्योतक आहे. 


तर आज याची आठवण येण्याचे कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी हा चित्रपट. 


या चित्रपटात लव्ह जिहादचा विषय अत्यंत प्रखरतेने मांडण्यात आलेला आहे. परधर्मातील मुलींना फूस लावून प्रेमात पाडायचे आणि नंतर त्यांना दहशतवादी बनवायचे अशी दहशतवादी संघटनेची  योजना असते. यासाठी देशातील प्रत्येक ठिकाणी काही मुलींना नियुक्त केलेले असते. या मुली कॉलेजमधील तरुणींना हेरून त्यांचे ब्रेन वॉश करून, त्यांना फूस लावून, औषधाच्या रुपात ड्रग्ज देऊन मुस्लिम संस्कृतीबाबत सतत माहिती देऊन त्यांचे धर्म परिवर्तन करतात. यासाठी या तरुणींना प्रेमात पाडण्यासाठी काही देखण्या तरुणांची नियुक्ती केलेली असते. या मुली अलगद त्यांच्या जाळ्यात सापडतात आणि नंतर त्यांचे आयुष्य नकोसे होऊन जाते. 


द केरळ स्टोरीमध्ये नर्सिग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अशाच चार मैत्रीणींची कथा सांगितली गेली आहे. यापैकी एक असते शालिनी (अदा शर्मा), दुसरी असते गीतांजली (सिद्धी इदनानी), तिसरी असते निधी (योगिता बिहानी) आणि चौथी असते असिफा (सोनिया बलानी). असिफाकडे दुसऱ्या धर्मातील मुलींना फसवण्याची जबाबदारी असते. या कामी तिला काही तरुण मदत करीत असतात. शालिनी त्यांच्या जाळ्यात अडकते आणि थेट सूदानमध्ये पोहोचते, कम्युनिस्ट पित्याची मुलगी असलेली गीतांजली जाळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते परंतु त्यांच्या जाचामुळे आत्महत्या करते. निधीवरही अत्याचार होतात पण ती लढण्याचे बळ दाखवते. अदा उर्फ फातिमाला जेव्हा पोलीस दहशतवादी म्हणून पकडतात तेव्हा ती आपली कथा सांगते आणि ती कथा म्हणजेच हा चित्रपट.


हा चित्रपट त्याच्याबद्दल झालेल्या चर्चेबद्दल विचार न करता, एक स्वतंत्र कलाकृती म्हणून पाहिले तर एक अत्यंत उत्कृष्ट आणि जीवंत विषयावर चित्रपट आहे हे जाणवते. अंगावर काटे येतील अशा प्रकारे काही दृश्यांचे चित्रिकरण करण्यात आलेले आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मामधील फरक सांगताना अनेक मुद्दे उपस्थित केले गेलेत. खरे तर हिंदू धर्माबद्दल अनेक गोष्टी म्हटल्या गेल्यात, याच गोष्टी दर दुसऱ्या कुठल्या धर्माबद्दल असत्या तर हा चित्रपट प्रदर्शितच झाला नसता. या चारही अभिनेत्रींनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. त्यातही अदा शर्माची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. शालिनीचे मुस्लिम धर्माकडे आकर्षित होणे, त्यानंतर फातिमा बनणे, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करणे, मुलीचा विरह या सगळ्या गोष्टी तिने अत्यंत प्रखरपणे दाखवल्या आहेत. असिफा झालेली सोनिया बलानीही चीड निर्माण करण्यात यशस्वी होते. पण एखादी जबाबदारी दिली की ती कशा प्रकारे पाड पाडावी हे तिने चांगले दाखवले आहे. सिद्धी आणि सोनियानेही चांगले काम केले आहे.


सुदिप्तो सेनने दिग्दर्शक म्हणून या मुलींचा प्रवास पडद्यावर अत्यंत उत्कृष्टपणे, टोकदारपणे, भाषणबाजी न करता आणि प्रेक्षकांवरच सगळे सोडून देणारा चित्रपट सादर केला आहे. सुदिप्तोने मुलींचा हा प्रवास कुठेही प्रपोगंडा होणार नाही याची काळजी घेत सादर केलेला आहे. जे घडले, जसे घडले ते त्याने अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर मांडलेले असल्यानेच चित्रपट प्रेक्षकांची पकड घेण्यात यशस्वी ठरतो. विशाखाज्योती आणि वीरेश श्रीवल्सा यांचे संगीत चित्रपटाला पूरक आहे.


सिनेमेटोग्राफ़र प्रशांतु महापात्र याने केरळ ते अफगाणिस्तान ते सीरीयाचे खूपत चांगले चित्रिकरण केलेले आहे. प्रत्येक फ्रेम चांगली कशी होईल आणि कथानकाला पूरक ठरत कथा पुढे कशी जाईल याकडे अत्यंक बारकाईने लक्ष दिलेले आहे. संगीताच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. संगीतकार चित्रपटाची कथा सत्यपाल सिंह, सुदिप्तो सेन आणि विपुल अमृतलाल शाह यांनी लिहिलीय. खऱ्या घटनांशी बांधिलकी ठेवत त्यांनी चित्रपटाची रचना एखाद्या व्यावसायिक चित्रपटाप्रमाणे केली आहे. आणि हेच या चित्रपटाचे यश आहे.


सगळ्यात जास्त प्रशंसा करावी लागेल ती निर्माता आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह याची. अशा या वेगळ्या आणि थोडासा धाडसी विषय असलेल्या, वादग्रस्त होऊ शकत असलेल्या विषयावर त्याने एक सुरेख कलाकृती निर्माण केली आहे. चित्रपट खरोखरच चांगला असल्याने तो प्रेक्षकांचा ठाव घेण्यात यशस्वी ठरलाय. प्रपोगंडा म्हणून न बघता एक हिंदी सिनेमा म्हणून याकडे पाहिले तर चित्रपटाचा आनंद आणखी जास्त घेता येईल. मात्र प्रत्येक गोष्टीकडे एकाच बाजूने बघण्याचा अनेकांचा दृष्टीकोण असल्याने याला विरोध केला जातोय. खरे तर शबाना आझमीपासून अनेकांनी चित्रपटाला विरोध योग्य नाही असे म्हटले आहे. आणि तेच खरे आहे.