Scoop review: अंडरवर्ल्ड,  दहशतवाद, गुन्हेगारी या सर्व विषयांवर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट तुम्ही पाहिले असतील. या वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये अनेकवेळा पत्रकारांना दाखण्यात येते.  पण पत्रकारांची बाजू मांडणारे चित्रपट आणि वेब सीरिज फार कमी आहेत. 'स्कूप' ही वेब सीरिज अशा एका पत्रकारावर आधारित आहे, जी स्वत: ची बाजू मांडण्यासाठी लढत असते.  सध्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या स्कूप या वेब सीरिजची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ही वेब सीरिज जिग्ना व्होरा यांनी लिहिलेल्या Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्तकावर आधारित आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एक फोन आल्यानंतर जागृती पाठक नावाच्या जर्नलिस्टचं आयुष्य कसं बदलतं? हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 


स्कूप या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे की, जागृती पाठक ही गेली 7 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात  काम करत असते. एका प्रसिद्ध वृत्तपत्राची डेप्युटी ब्युरो चीफ म्हणून ती काम करत असते. पेपरच्या फ्रंटपेजवर आपलं आर्टिकल असावं असं जागृतीला नेहमी वाटत असतं. जागृती एक आर्टिकल लिहिण्यासाठी अनेक सोर्सकडून माहिती घेत असते. IB आणि मुंबई पोलीस यांच्याबद्दल जागृतीला एका आर्टिकल लिहायचे असते. ती ज्या विषयावर आर्टिकल लिहित असते, त्यासोबत छोटा राजनचे कनेक्शन आहे, असं जागृतीला वाटतं. याबाबत कन्फर्म माहिती मिळवण्यासाठी जागृतीला छोटा राजनसोबत बोलायचे असते. छोटा राजनसोबत संपर्क होण्यासाठी जागृती तिच्या काही सोर्सेसकडे जाते. त्यापैकी एक सोर्स जागृतीला छोटा राजनसोबत कॉन्टॅक्ट करुन देण्याचे आश्वासन देतो. पण त्याबदल्यात त्या सोर्सला जयदेब सेन या पत्रकाराची माहिती हवी असते. जागृती ती माहिती देण्यास नकार देते.


एकेदिवशी जागृती ऑफिसमध्ये असताना छोटा राजनचा तिला फोन येतो. छोटा राजनसोबत बोलणं झाल्यानंतर जागृती आर्टिकलवर काम करण्यास सुरुवात करते. तेवढ्यात जागृती तिच्या कुटुंबासोबत काश्मिराला ट्रीपला जाते. जागृती एकिकडे कुटुंबासोबत ट्रीप एन्जॉय करत असते. तर दुसरीकडे मुंबईमध्ये जयदेब सेनची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या होते. ही हत्या छोटा राजनच्या माणसांनी केलेली असते.  जयदेब सेनच्या हत्या प्रकरणात जागृती समील आहे, असं पोलिसांना वाटतं. पोलीस तपास सुरु करतात. त्यात छोटा राजननं जागृतीला काही दिवसांपूर्वी फोन केला होता, हे पोलिसांना कळते. त्यानंतर जागृतीला जयदेब सेनची माहिती छोटा राजनला दिल्या प्रकरणी अटक करण्यात येते. या संपूर्ण प्रकरणामुळे जागृतीचं आयुष्य उद्धवस्त होते. या प्रकरणातून  बाहेर येण्यासाठी जागृती कसा लढा देते? त्या दरम्यान ती कोणकोणत्या समस्यांचा सामना करते हे स्कूप या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 


स्कूप या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नानं जागृती पाठक ही भूमिका साकारली आहे. करिश्मानं या वेब सीरिजमध्ये उत्तम अभिनय केला आहे.  स्कॅम 1992 या वेब सीरिजमुळे हंसल मेहता यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. स्कॅम 1992  प्रमाणेच स्कूप या वेब सीरिजचे देखील हंसल मेहता यांनी उत्तम दिग्दर्शन केलं आहे.