Tamasha live Movie Review : काही सिनेमे असतात जे छान जुळून येतात आणि काही सिनेमे असतात जे जुळवून आणावे लागतात. ‘तमाशा लाईव्ह’ हा दुसऱ्या प्रकारात मोडणारा सिनेमा आहे. कारण अशा पद्धतीचा सिनेमा करणं सोपं काम नाही. 


छोट्या पडद्यावरचं नाट्य, रंगमंचीय नाट्याच्या रुपात रुपेरी पडद्यावर साकारणं तेही सांगितिक ढंगात ही कल्पनाच भन्नाट आहे. या कल्पनेला पुरेपूर न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न ‘तमाशा लाईव्ह’च्या टीमने केला आहे आणि त्यासाठी त्यांचं कौतुक करायलाच हवं. 


संजय जाधव जो स्वत: उत्तम दिग्दर्शक आहे, कमाल सिनेमॅटोग्राफर आहे, ज्याचा एडिटिंगचा सेन्स जबरदस्त आहे. असाच माणूस या सिनेमाची पटकथा लिहू शकतो, कारण पटकथा ही या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. सिनेमा शूटिंग फ्लोअरवर जाण्याआधीच तो पूर्णपणे बांधला गेला आहे आणि त्या चौकटीत, त्या मर्यादेत राहून तो घडवला आहे असं सिनेमा पाहाताना प्रत्येक प्रसंगामध्ये जाणवतं. कारण त्याशिवाय जो प्रयोग संजय जाधव पडद्यावर रंगवू पाहातोय त्याचा तोल सांभाळता आला नसता की जे परिणामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं होतं.


मी तांत्रिक बाजूंबद्दल इतकं बोलतो आहे कारण ज्यापद्धतीचा फॉर्म या सिनेमासाठी निवडला गेला आहे तिथं एका फ्रेमचीही चूक हा संपूर्ण डोलारा खाली घेऊन आली असती पण तसं काहीही न होता पहिल्या फ्रेमपासून हा सिनेमा खिळवून ठेवतो आणि अत्यंत वेगानं पुढे सरकतो. 


या साऱ्या तांत्रिक गोष्टींना तेवढीच तोलामोलाची साथ लाभली आहे ती कलाकारांची. सोनाली कुलकर्णीने साकारलेली मध्यवर्ती भूमिका उत्तम झाली आहे. खरं तर या भूमिकेला फार शेड्स नाहीत पण तरीही ते एकसूरी न होता जास्तीत जास्त प्रभावी कसं होईल यावर तिने घेतलेली मेहनत फळाला आली आहे. सचित पाटील आजवर अनेक सिनेमांमधून, मालिकांमधून आपल्या समोर आला आहे मात्र यात त्याने साकारलेला अश्विन त्याच्या सर्वोत्तम कामांपैकी एक असेल. सिद्धार्थ जाधवबद्दल काही बोलायलाच नको. त्याने आणि हेमांगीने जवळपास दोन डझन भूमिका अगदी धमाल करत साकारल्या आहेत. 


अरविंद जगताप यांचे संवाद, क्षितीज पटवर्धनने लिहिलेली गाणी आणि त्याला अमितराज आणि पंकज पडघन यांनी चढवलेला स्वरसाज हे सारंच कमाल आहे. कथेला कुठेही धक्का न लावता, कथेतून कुठेही बाहेर न आणता त्यांनी ही कामगिरी चोख बजावली आहे. 


खरं तर आपण तमाशा लाईव्ह बद्दल बोलतोय पण मी इथं प्राजक्त देशमुखच्या ‘जाळीयली लंका’ या दीर्घांकाचा आवर्जून उल्लेख करेन. या सिनेमाचा आशय-विषय त्या दीर्घांकाच्या खूप जवळ जाणारा आहे. अर्थात दोन्ही कलाकृती स्वतंत्र मात्र तितक्याच प्रभावी आहेत. 


एकंदर सर्वच बाजुंनी उत्तम जमवून आणलेली ही कलाकृती आहे जी थिएटरमध्ये जाऊनच अनुभवायला हवी. या साऱ्यामध्ये खटकणाऱ्या गोष्टी फारशा नाहीत. एवढंच सांगेन की सिनेमाचा फॉर्म तुम्हाला पहिल्या पाच मिनिटात आवडला तर सिनेमा संपेपर्यंत तुम्ही जागचे हलणार नाही. या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स.