Raundal Movie Review : 'रौंदळ' (Raundal) सिनेमा मला भावला तो त्याच्या अस्सलपणासाठी. गावचं वातावरण, तिथलं राजकारण, तिथली माणसं, त्यांची भाषा, त्यांच्या परंपरा, त्यांच्या समस्या हे सारंच प्रभावीपणे मांडण्यात सिनेमाची टीम यशस्वी ठरली आहे. गावाकडच्या मातीतली गोष्ट जेव्हा आपण सांगतो तेव्हा ती गोष्ट आधी लिखाणाच्या पातळीवर तेवढीच जुळून येणं जास्त गरजेचं असतं. कारण गावाकडचं 'व्याकरण' थोडं वेगळं असतं.  मग ते भाषेच्या बाबतीत असो वा क्रिया-प्रतिक्रीयांच्या बाबतीत. हा सिनेमा पाहताना त्या साऱ्याच गोष्टींवर जास्त मेहनत घेतली गेली आहे ते जाणवतं. म्हणून यात कुठेही तडजोड केल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक संवाद आणि ज्या वातावरणात ते सारं घडतं ते वातावरण प्रेक्षक म्हणून आपल्याला कन्व्हिन्स करणारं आहे आणि तेच या सिनेमाचं यश आहे.


शेतकरी, त्यांच्या व्यथा, भांडवलशाही आणि कारखानदारी विरुद्धचा त्यांचा लढा हा या सिनेमाचा विषय असला तरी त्याची मांडणी खिळवून ठेवणारी आहे. मुळात आम्ही प्रश्न मांडतो आहे हा आव न आणता हा सारा डोलारा उभा केल्यानं मनोरंजन या मूळ हेतूला कुठेही धक्का लागलेला नाही. अर्थात याचं श्रेय दिग्दर्शकालाच द्यायला हवं.


भाऊसाहेब शिंदेसारखा (Bhausaheb Shinde) गुणी अभिनेता या सिनेमाचा हिरो आहे. 'ख्वाडा'सारख्या सिनेमातून त्याने त्याची क्षमता सिद्ध केली आहे. ‘रौंदळ’मध्येही तो निराश करत नाही. प्रत्येक सीन त्याने कमाल निभावला आहे. अर्थात त्याच्या परफॉर्मन्समध्येही दिग्दर्शक दिसत राहतो. कारण भाऊसाहेबच्या जमेच्या बाजू अधोरेखित करणारा या कॅरॅक्टरचा आलेख आहे. कॅमेऱ्यासमोरचा त्याचा वावर इतका सहज आहे की कुठेही तो अभिनय करतो आहे असं जाणवत नाही.


त्याच्यासोबत नायिकेच्या भूमिकेत असलेली नेहा सोनवणेसुद्धा छोट्या छोट्या प्रसंगातून भाव खाऊन जाते. तिचा पहिलाच सिनेमा असूनही कुठेही नवखेपणा दिसत नाही. संजय लकडे, यशराज डिंबळे, गणेश देशमुख, शिवराज वाळवेकर यांची कामंही तेवढीच तगडी झालेली आहेत. यातल्या प्रत्येकाने आपआपली भूमिका अक्षरश: जगली आहे त्यामुळंच सिनेमा म्हणून रौंदळ हे प्रकरण प्रेक्षकांना भावेल अशा पद्धतीचं झालेलं आहे. 


सिनेमेटोग्राफर अनिकेत खंडागळे, संकलक फैजल महाडिक आणि साऊंड डिझायनर महावीर साबन्नावार यांनी सिनेमाची तांत्रीक बाजू समर्थपणे पेलली आहे. सिनेमाचा एकंदर मूड त्यांच्या कामातून व्यवस्थित जपला गेला आहे आणि अगदी ठळकपणे अधोरेखित झाला आहे.  


अर्थात या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी मला खटकली त्या सिनेमातील गाण्यांची संख्या. हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेली सगळीच गाणी उत्तम झाली असली तरी त्याचा सिनेमात समावेश करताना थोडासा हात आखडता घ्यायला हवा होता. कारण सिनेमाच्या एकंदर गतीला ही गाणी काहीशी मारक ठरतात आणि गोष्ट रेंगाळते. ही एक गोष्ट आणि पटकथेतला एखादा दुसरा अपवाद सोडला तर 'रौंदळ' सिनेमा म्हणून उत्तम जुळून आलेला सिनेमा आहे. या सिनेमाला मी देतो आहे तीन स्टार्स.


Raundal  Official Trailer: 'रौंदळ'चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज