Sirf Ek Banda Kafi Hai : गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातील काही सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत तर काही ओटीटीवर. आता अभिनेता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) 'सिर्फ एक बंदा काफी है' (Sirf Ek Banda Kafi Hai) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 


ज्याला आपण देव मानतो तोच पाप करतो तेव्हा काय होतं हे 'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. ही कथा अशा एका बाबाची आहे ज्याला लोक देव मानतात. पण त्याने आपल्या भक्तावर मात्र अन्याय केला आहे. हा आपल्या अल्पवयीन मुलाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाबद्दल आहे. हा कोर्टरुम ड्रामा प्रत्येकाने पाहायलाच हवा. 


'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमाच्या सुरुवातीला पीसी सोलंकी यांची कथा असल्याचं सांगण्यात आलं होतं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापूंना तुरुंगात पाठवणारा सोळंकी हा वकील आहे. या सिनेमात थेट कोणाचंही नाव घेण्यात आलेलं नाही. पण वकील पीसी सोळंकी यांच्या नावावरुनच सिनेमाच्या कथेचा अंदाज येतो. 


'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Sirf Ek Banda Kafi Hai Movie Story)


'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक अल्पवयीन मुलगी आणि तिचे पालक दिल्लीतील कमल नगर पोलीस ठाण्यात जाताना दिसतात. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ते एका बाबावर अल्पवयीन शोषणाचा गुन्हा दाखल करतात. गुन्ह्याची नोंददेखील पोलीसदेखील त्या बाबाला अटक करतात. दरम्यान बाबांचे भक्त संतापतात. वकील पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान मुलीचे आई-वडील पीसी सोळंकी यांची मदत घेतात. त्यामुळे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहायला हवा. 


अभिनेता मनोज वाजपेयीने 'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमात खूपच कमाल काम केलं आहे. राजस्थानच्या भाषेवर त्याने खूपच चांगलं प्रभुत्व मिळवलं आहे. या सिनेमासाठी त्याने घेतलेली मेहनत सिनेमा पाहताना दिसून येते. एकंदरीतच मनोजने पीसी सोलंकीची गोष्ट खऱ्या अर्थाने जिवंत केली आहे. अल्पवयीन मुलीची भूमिका अदिती सिंह एंड्रिजाने साकारली आहे. तिचंदेखील काम चांगलं झालं आहे. विपिन शर्माचा अभिनय जबरदस्त आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी या आपलं पात्र योग्यपद्धतीने साकारलं आहे. 


'सिर्फ एक बंदा काफी है' कसा आहे? 


'सिर्फ एक बंदा काफी है' या सिनेमात प्रेक्षक शेवटपर्यंत गुंततो. हा एक सर्वोत्कृष्ट कोर्ट ड्रामा आहे. जर तुम्ही सत्याच्या पाठीशी असाल तर तुमचे काहीही नुकसान होऊ शकत नाही, ही या सिनेमाची गोष्ट आहे. या सिनेमाला एक गती आहे. या सिनेमातील संवाद, दृश्ये अत्यंत प्रभावी आहेत. 


अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित या सिनेमात एक महत्त्वाचा विषय अतीशय सोप्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे दिग्दर्शकांचं विशेष कौतुक. अशापद्धतीच्या कथेची निर्मिती केल्याबद्दल या सिनेमाचे निर्माते विनोद भानुशाली यांचेही कौतुक करायला हवे.