Kathal Review : जर तुम्हाला मथुरेत राहायचं असेल तर तुम्हाला राधे राधे म्हणालं लागेल आणि आयपीसीचा (IPC)अर्थ भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) नसून भारतीय राजकीय संहिता (Indian Political Code) आहे. 'कटहल' (Kathal) सिनेमातील हे डायलॉग प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. 'कटहल' हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 


'कटहल' सिनेमाचं कथानक काय आहे? (Kathal Movie Story)


मथुरेतील एका आमदाराच्या घरातून दोन फणसांची चोरी झाली आहे. हे फणस परदेशातून आणलेले आहेत. या परदेशी फणसाचं लोणचं जर आमदारांनी मोठ्या नेत्यांना खाऊ घातलं तर तेदेखील त्यांच्यासारखे मोठे मंत्री होऊ शकतात. त्यामुळे या फणसाचं खूप महत्त्व आहे. हे फणस शोधण्यासाठी खास पोलिसांना सांगण्यात आलं आहे. पण पुढे सिनेमाच्या कथेत एक ट्विस्ट येतो. एक मुलगीदेखील बेपत्ता असल्याचं समोर येतं. आता या बेपत्ता असणाऱ्या मुलीने फणस चोरला आहे का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल. 'कटहल' सिनेमातील काही ट्विस्ट प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतात. 


'कटहल' सिनेमा कसा आहे? 


1 तास 55 मिनिटांचा 'कटहल' हा सिनेमा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या सिनेमाचा सुरुवातीला काही भाग फारच मजेशीर आहे. फणसाची चोरी कशी होते आणि मग पोलीस त्याचा तपास करतात हे पाहायला प्रेक्षकांना खूपच मजा येते. या सिनेमातील संवाददेखील खूप छान आहेत. सिनेमातील सर्वच कलाकारांनी मथुरेची भाषा शिकली आहे. सिनेमाचं कथानक लांबलचक नाही. त्यामुळे तो वेगाने पुढे सरकतो आणि मग सिनेमातील क्लायमॅक्स तुमचं मन जिंकतं. 


'कटहल' या सिनेमात सान्या मल्होत्राने एका पोलीस अधिकारीची भूमिका साकारली आहेत. या सिनेमातील तिचा अभिनय खूपच जबरदस्त आहे. सान्याने या सिनेमासाठी घेतलेली मेहनत सिनेमा पाहताना जाणवते. तिची देहबोली ते हावभाव सगळचं अप्रतिम आहे. अनंत जोशीचा अभिनयही खूप छान आहे. राजपाल यादवने साकारलेला पत्रकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. विजय राजने साकारलेला आमदार खूपच दमदार आहे. रघुवीर यादव आणि विजेंद्र काला यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. 


यशोवर्धन मिश्रा यांचं दिग्दर्शन खूप चांगलं आहे. संपूर्ण कुटुंबासोबत बसून आरामात बघता येईल असा हा 'कटहल' सिनेमा त्यांनी बनवला आहे. सिनेमावरील त्यांची पकड पूर्णपणे टिकून आहे. दोन तासांपेक्षा कमी कालावधीच्या सिनेमात संगीताला कमी वाव असतो. पण 'कटहल' सिनेमातील राम संपतचे संगीत सुखदायक असून ते सिनेमाला गती देतं.