Kalki 2898 AD Review in Marathi :  चित्रपट हा कोणासाठी तयार केला जातो? चित्रपट समीक्षकांसाठी? इतिहासकारांसाठी? पौराणिक गोष्टी समजाणाऱ्यांसाठी? या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना माहीत आहे, चित्रपट हा प्रेक्षकांसाठी तयार केला जातो. पण चित्रपट या प्रेक्षकांनाच समजला नाही तर?


चित्रपटाची कथा काय?


या चित्रपटाची कथा सहजासहजी कळत नाही. ही कथा हिंदू पौराणिक कथांचे मिश्रण आहे. महाभारतात, कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धानंतर, भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिलेला असतो की तो जिवंत राहिल. कलियुगात पाप वाढल्यास त्याला संपवण्यासाठी स्वत: देव पुन्हा अवतार घेतील आणि त्याचे रक्षण त्यावेळी करायला लागेल असे सांगितले जाते. त्यानंतर गोष्ट हजारो वर्षांनी पुढे जाते.


सर्वात पहिल्यांदा जुनं शहर काशीमध्ये ही गोष्ट जाते.  या ठिकाणी सुप्रीम यास्किन आणि  डॉन फर्टाइल हा मुलींना कैदी बनवून ठेवतो. तो एका गर्भवती मुलीच्या शोधात आहे जिचा डीएनए त्याला पुन्हा मजबूत करेल. ते मूल सुमतीच्या म्हणजेच दीपिका पदुकोणच्या पोटात वाढत आहे. अश्वत्थामा म्हणजेच अमिताभ बच्चनला तिला वाचवायचे आहे, भैरवाला म्हणजेच प्रभासला सुमती यास्किनला द्यायची आहे. भैरव हा भाडोत्री गुंड अर्थात बाउंटी आहे. यास्किनने त्याला या कामासाठी पैसे दिलेले आहेत. त्याशिवाय, त्याला काशीच्या कॉम्प्लेक्समध्ये स्थान मिळणार आहे. कथेत एका कॉम्प्लेक्सचा उल्लेख आहे आणि ही कथा स्वतःच खूप गुंतागुंतीची आहे. मेंदूवर खूप दबाव टाकूनही समजू शकत नाही असे आहे. 


कसा आहे चित्रपट?


सुरुवातीला चित्रपट समजत नाही. हे काय होतंय आणि का होतंय आणि आपण हा चित्रपट पाहण्यासाठी का आलोय असा प्रश्नही मनात निर्माण होतो. तुम्हाला नाईलाजाने इतरांना विचारावं लागतं की तुम्हाला काही समजले का? खूप वेळेनंतर मध्यांतर होतो. मध्यांतरानंतर चित्रपट जरा चांगला झालाय. चांगले व्हीएफएक्स दिसतात. भव्यता दिसून येते. शेवटच्या 35 मिनिटात  चित्रपटात काहीतरी आहे, असे वाटते. अन्यथा संपूर्ण चित्रपट हा तुरुंगातील शिक्षेसारखा वाटतो. 


जर तुम्हाला पौराणिक कथांचे ज्ञान असेल तर कदाचित तुम्हाला चित्रपट समजणे सोपे जाईल पण आपण मनावर इतका ताण देण्यासाठी चित्रपट पाहायला जात नाही, मनोरंजनासाठी जातो. जे येथे क्वचितच आढळते, फक्त काही दृश्ये आहेत जी पाहण्यास छान वाटतात. तीदेखील अमिताभ बच्चन यांचे सीन्स छान आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्यासोबत काही अपघात झाल्यासारखे वाटते. कदाचित या चित्रपटाचा दुसरा भाग आल्यानंतर या चित्रपटाची कथा व्यवस्थित उलगडू  शकेल. 


कलाकारांचा अभिनय


अमिताभ बच्चन यांचा अभिनय दमदार आहे. बिग बी आपल्याला याबाबत निराश करत नाहीत. प्रत्येक सीन त्यांनी दमदारपणे केला आहे. चित्रपटात हीच गोष्ट चांगली आहे. प्रभासने निराशा केली आहे. प्रभास काय करतोय हे समजायला मार्ग नाही. चेहऱ्यावर हावभावही दिसत नाही. चित्रपटाच्या मध्येच एखाद्या कार्टुनसारखा नाचायला लागतो. दीपिकाने हा चित्रपट का केला हे समजण्यास मार्ग नाही. तिच्या वाटेला फारशी भूमिकाच नाही. कमल हासन यांचे काम दमदार आहे. पण, त्यांच्या वाटेलाही फारसं काम नाही. चित्रपटात अनेकांचे कॅमिओ आहेत. विजय देवरकोंडा, एस एस राजमौली, मृणाल ठाकूर, राम गोपाल वर्मा, दिशा पाटनी आदी कलाकार आहेत. त्यापैकी राम गोपाल वर्मा आणि दिशाच्या एन्ट्रीच्या वेळी उत्सुकता निर्माण होते. इतर कलाकार फारशी छाप सोडत नाही. 


दिग्दर्शन कसे आहे?


दिग्दर्शक नाग अश्विन यांचे व्हिजन मोठे आहे. स्केल मोठी आहे, स्टारकास्ट तगडी आहे. बजेट मोठं आहे पण सादरीकरण एंटरटेनिंग नाही. चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना सहजपणे समजली पाहिजे. प्रेक्षकांचा गुंता वाढवू नये. चित्रपटाची सुरुवात फसली आहे. नाग अश्विनचे दिग्दर्शन फारसे प्रभावी वाटले नाही. चित्रपटात मसाला नाही. 


चित्रपटाच्या शेवटी काही भाग एंटरटेनिंग आहे पण तोही थोडाच भाग. अमिताभ बच्चन यांच्यासाठी तु्म्ही हा चित्रपट पाहू शकता.