Nana Patekar : आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी सिनेसृष्टीत छाप सोडली आहे. नाना पाटेकर यांची भूमिका असलेल्या चित्रपटांचे आजही कौतुक सुरू असते. नाना पाटेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'प्रहार' (Prahaar) चित्रपट आजही लोकप्रिय आहे. आपल्या दिग्दर्शनातील पदार्पणाच्या चित्रपटाच्या वेळी घडलेला एक किस्सा नाना पाटेकरांनी सांगितला.
नाना पाटेकर यांनी 'प्रहार' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. 'द लल्लनटॉप' या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी विविध प्रश्नांना बेधडक उत्तरे दिली. 'प्रहार'या आपल्या पहिल्या दिग्दर्शनातील चित्रपटाबाबत बोलताना नानांनी सांगितले की, 'परिंदा'नंतर 'प्रहार'ची जुळवाजुळव सुरू केली. मलाही आर्मीत जायचे होते, या चित्रपटाच्या निमित्ताने मी ती इच्छाही पूर्ण केली. या चित्रपटात सई परांजपे यांचा मुलगा गौतम जोगळेकर हा सिनेमाटोग्राफर देबू देवधर यांचा अस्टिस्टंट होता. त्याला मी या भूमिकेसाठी निवडले. त्यावेळी देबूने म्हटले की ह्याला व्यवस्थित बोलता येत नाही. पण, मी त्याला सांगितले की मला असाच अभिनेता हवाय.
प्रहार हा अधिक ऑथोंटिक चित्रपट झाला होता. त्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये असलेले सुनिल देशपांडे यांनी मदत केली होती. त्याशिवाय, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह हे त्यावेळी कमांडो विंगमध्ये होते. त्यांनीदेखील सहकार्य केले.
त्या अभिनेत्याची हालत गंभीर...
प्रहार चित्रपटात असलेल्या प्रशिक्षणाच्या दरम्यानच्या शूटिंगचा किस्सा नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितला. आपल्याला पाय ठेवण्यासाठी दोन इंचाची जागेची गरज असते. त्या प्लॅटफॉर्मवर साधारणपणे चार इंचाची जागा होती. त्या सीनमध्ये खाली पाहिले की भीती वाटायची. पण फक्त पायाकडे लक्ष दिल्यास चालता येत असे, असेही नाना पाटेकरांनी म्हटले. त्या आर्मी ट्रे्निंगच्या शूटच्या वेळी 60 फूट उंचीवरून चालायचे होते. त्यावेळी शिव सुब्रम्हण्यम या कलाकाराला उंचीची भीती वाटत होती. त्यात त्याने खाली पाहिल्याने आणखीच घाबरला. त्यावेळी भीतीने या कलाकाराने भीतीने पँट ओली केली आणि रडू लागला होता, असे नाना पाटेकर यांनी सांगितले.
या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी जबरदस्त काम केले. त्यांच्या कामामुळे आणि देबू देवधर यांच्या सिनेमॅटोग्राफीमुळे चांगला परिणाम साधला गेला असल्याचेही नाना पाटेकर यांनी सांगितले. 'प्रहार' नंतर मात्र आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी चित्रपटात काम करू लागलो असल्याचे नाना पाटेकरांनी सांगितले.