Kakuda Movie Review :  मागील काही दिवसांपासून 'मुंज्या' (Munjya) या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. माऊथ पब्लिसिटीवर चाललेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) याच आणखी एक हॉरर-कॉमेडीपट 'ककुडा'  (Kakuda Movie) हा ओटीटीवर रिलीज झाला आहे.


 चित्रपटाची गोष्ट काय?


चित्रपटाची गोष्ट ही रतौडी गावातून सुरू होते, जिथे गावकऱ्यांना दर मंगळवारी 7.15 वाजता घराचा छोटा दरवाजा उघडावा लागतो. घरातील कोणताही पुरुष सदस्य असे करू शकला नाही तर त्याच्या पाठिवर कुबड येते आणि 13 व्या दिवशी त्याचा मृत्यू होतो. असे का घडते याच्या वेगवेगळ्या कथा गावात आहेत. दरम्यान, रतौडी गावातील सनी म्हणजेच साकिब सलीम दुसऱ्या गावातील इंदू म्हणजेच सोनाक्षी सिन्हाच्या प्रेमात पडतो.


दोघेही घरातून पळून जाऊन लग्न करतात. त्यामुळे सनीला दरवाजा उघडण्यास उशीर होतो. त्यामुळे त्याच्या पाठिवर कुबड येते. इंदू त्याला दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे त्याला 'घोस्ट हंटर' व्हिक्टर म्हणजेच रितेश देशमुख भेटतो. इंदू सनीला वाचवू शकेल का? गावकरी ज्याच्यासाठी दार उघडतात तो ककुडा कोण? हे रहस्य हळूहळू उघड होत आहे.


कसा आहे चित्रपट?


हा चित्रपट स्त्री सारखा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात उत्सुकता निर्माण होते. दर मंगळवारी सायंकाळी 7.15 वाजता गावातील लोक दरवाजा का उघडा ठेवतात, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतो. मात्र, हळू-हळू चित्रपट आपला ट्रॅक सोडतोय असे वाटते. हा चित्रपट प्रेक्षकांना घाबरवतो, हसवतो आणि मध्येच डोळ्यात पाणी आणतो. मात्र, चित्रपट पुन्हा एकदा आपली लय पकडतो. मात्र, हा चित्रपट 'स्त्री' किंवा 'मुंज्या' सारखा नाही. टाईमपास करण्यासाठी हा चित्रपट पाहू शकता. 


कलाकारांचा कसा अभिनय आहे ?


सोनाक्षी सिन्हा दुहेरी भूमिकेत आहे आणि तिचे काम  ठीक ठाक आहे. यापेक्षा तिने चांगले काम केले आहे. साकिब सलीमने  चांगला  अभिनय केलाय.  रितेश देशमुखने खूप छान काम केले आहे. 'पंचायत'मधला फुलेरा गावचा जावई आसिफ खान यांचे काम चांगले आहे. 


दिग्दर्शन कसे आहे?


आदित्य सरपोतदारच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ठीक आहे. चित्रपटात आणखी मसाला चालला असता. स्क्रिन प्ले अधिक चांगला होऊ शकला असता. तुम्हाला हॉरर कॉमेडी चित्रपट आवडत असेल तर हा चित्रपट पाहू शकता.