Jigra Movie Review : काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक अभिनय देवचा सावी नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात दिव्या खोसलाने अशा पत्नीची भूमिका साकारली होती. जिचा पती हत्येच्या खोट्या आरोपावरून तुरुंगात गेलेला असतो, आपल्या पतीला ती कशी पळवून आणते त्याची कथा मांडण्यात आली होती. अगदी तशाच पद्धतीची कथा घेऊन आलिया भट्टचा जिगरा चित्रपट आला आहे. यात फक्त बदल एवढाच की येथे बहीण तुरुंगात असलेल्या भावाला पळवून आणते.
सत्या (आलिया भट्ट) आपला भाऊ अंकुर (वेदांग रैना)सोबत राहात असते. आईवडिल नसल्याने सत्याच अंकुरचे पालनपोषण करीत असते. काही कामानिमित्त अंकुरला हंशी दाओ नावाच्या देशात जावे लागते. तेथे पोलीस त्याला ड्रग्जच्या प्रकरणात अटक करतात. त्या देशात ड्रग्जचा व्यापार करणाऱ्यांना देहांताची शिक्षा दिली जाते त्याप्रमाणे अंकुरलाही देहांताची शिक्षा दिली जाते. अंकुर निरपराध आहे असे सत्याला वाटत असते आणि म्हणूनच त्याला सोडवण्यासाठी ती हंशी दाओला जाते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेतून त्याला सोडवणे कठिण असल्याचे जाणवल्यावर ती त्याला तुरुंगातून पळवून नेण्याची योजना आखते आणि शेवटी आपल्या प्रयत्नात यशस्वी होते.
आलियाने चित्रपटाच अँग्री यंग वुमनची भूमिका साकारली आहे पण ती कोठेही प्रभावी वाटत नाही. सत्याच्या भूमिकेत तिचा जराही प्रभाव पडत नाही. खरे पाहिले तर तिला खूप काही करण्यासारखे होते पण पटकथा आणि तिची भूमिकाच सशक्तपणे लिहिलेली नसल्याने आलियाचा प्रभावच जाणवत नाही. आलियाने हा चित्रपट का केला असाच प्रश्न हा चित्रपट पाहाताना पडतो.वेदांग रैनाने अंकुरची भूमिका बऱ्यापैकी केली आहे. अन्य भूमिकांमध्ये माजी गँगस्टरच्या भूमिकेतील मनोज पाहवा, निवृत्त पोलीस अधिकारी राहुल रवींद्रन, शीबा आणि आकाशदीप यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका ठीकठाक बजावल्या आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बालाने केले आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध आलिया आणि वेदांगच्या प्रेमावर खर्च केला आहे तर नंतर आलिया वेदांगला तुरुंगातून कशी पळवते त्यावर आहे. चित्रपटातील घटना अविश्वसनीय वाटतात. उत्तरार्धातील चित्रपटाच्या कथेवर जास्त लक्ष न दिल्याने चित्रपट पकड घेत नाही. चित्रपटाची निर्मिती आलिया भट्टने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसोबत केली आहे. तिने हा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न हा चित्रपट पाहाताना पडतो. या चित्रपटात एक दृश्य आहे ज्यात आलिया भाऊ वेदांगला तोंडावर दोन्ही हात ठेवायला सांगते आणि नंतर त्याच्या तोंडावर मारते. हा चित्रपट पाहाताना आपल्यालाही असेच वाटते . चित्रपट पाहाण्यासाठी आपले पैसे मुळीच वाया घालवू नका. नेटफ्लिक्सवर लवकरच हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
निर्मिती - धर्मा प्रॉडक्शन, इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन
दिग्दर्शक - वासन बाला
लेखक - वासन बाला, देवाशिष इंरेगम
रेटींद - दीड स्टार
कलाकार - आलिया भट्ट, वेदांग रैना, मनोज पाहवा, आकाशदीप, शीबा, राहुल रवींद्रन