Jaane Jaan Review: सुजॉय घोषचा विद्या बालन अभिनीत कहानी अजूनही विसरला जात नाही. विद्या बालनचा कमालीचा अभिनय आणि सुजॉयचे दिग्दर्शन यामुळे कहानी एका वेगळ्या उंचीवर पोहोचला होता. त्यामुळे सुजॉय आणि करीनाचा 'जाने जान' (Jaane Jaan) 'कहानी'पेक्षा एक पाऊल पुढे असेल असे वाटत होते. त्यातच हा चित्रपट किगो हिगाशिनो या जपानी लेखकाची रहस्यकथा 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' वर आधारित चित्रपट असल्याने चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता होती. पण चित्रपटाने अपेक्षाभंग केला.


पश्चिम बंगालमधील कॅलिपॉन्ग येथे माया डिसोझा (करीना कपूर) आपल्या मुलीबरोबर राहात असते. उदरनिर्वाहासाठी ती एक हॉटेल चालवत असते. तिचा शेजारी असतो नरेन नावाचा एक शिक्षक (विजय अहलावत) जो एकटाच राहात असतो आणि त्याचे चरित्र काहीसे गूढ वाटत असते. एक दिवस मायाचा पोलीस असलेला विभक्त पती अजित म्हात्रे (सौरभ सचदेवा) मायाला भेटायला येतो. दोघांचे लव्ह मॅरेज असते, मात्र त्याच्या त्रासाला कंटाळून माया मुलीसह कॅलिपॉन्गमध्ये आलेली असते. अजित मायाला ब्लॅकमेल करू लागतो. त्यात दरम्यान मुंबईचा पोलीस अधिकारी  करण (विजय वर्मा) अजितच्या शोधासाठी कॅलिपॉन्गमध्ये येतो. त्याचवेळी अजितची हत्या होते. करण अजितच्या मारेकऱ्याला शोधण्याचे काम सुरु करतो. अजितची हत्या कोणी केली हे प्रेक्षकांना सुरुवातीलाच समजते. मात्र करण मारेकऱ्याचा शोध घेण्यात अयशस्वी ठरतो.चित्रपट पाहाताना सतत 'दृश्यम' चित्रपटाची आठवण येत राहाते. मात्र दृश्यम जसा मनात उतरतो तसा जाने जान उतरत नाही. शेवट तर एकदमच अनाकलनीय दाखवलेला आहे. चित्रपट सुरुवातीला चांगाल वाटतो मात्र नंतर चित्रपट पकड घेण्यात अयशस्वी ठरतो. करीना कपूरची मुख्य भूमिका असली तरी तिची व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे लिहिली गेली नसल्याने ती उठून येत नाही. करीनाही मायाच्या भूमिकेला न्याय देण्यात अयशस्वी ठरलेय, अर्थात दोष तिची व्यक्तिरेखा लिहिणाऱ्याचाही आहे.


नरेनच्या भूमिकेत विजय अहलावत ने खूपच चांगले काम केले आहे. त्याची भूमिका आपल्या लक्षात राहते. करणच्या भूमिकेत विजय वर्मानेही चांगला अभिनय केलेला आहे. सुजोय घोषच्या दिग्दर्शनात काही नवीन जाणवले नाही. रहस्यपट म्हटले की, तो थोडासा वेगवान असावा आणि प्रेक्षकांना गुंगवून ठेवणारा असावा. मात्र सुजोय या आघाड्यांवर अपयशी ठरलाय. एकूणच करीना कपूरचे ओटीटीवरील आगमन काहीसे सुखद झालेले नाही. जाने जां पाहाण्यासाठी वेळ घालवण्याऐवजी आणखी एकदा कहानी किंवा दृश्यम पाहिल्यास जास्त आनंद मिळेल.