Goodbye Movie Review : तुमचं तुमच्या कुटुंबावर किती प्रेम आहे? कुटुंबातील सदस्यांची तुम्ही काळजी घेता? 'गुडबाय' (Goodbye) हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला असे अनेक प्रश्न पडतील.
'गुडबाय' सिनेमाचं कथानक काय आहे?
अमिताभ आणि नीना गुप्ता यांची चार मुलं वेगवेगळ्या देशात स्थायिक आहेत. नीना गुप्तांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानंतर अमिताभ त्यांच्या मुलांना अंत्यसंस्कारासाठी बोलवतात. पण नीना-अमिताभ यांची मुलं खरचं आपल्या कुटुंबावर प्रेम करतात का? यावर बेतलेला हा सिनेमा आहे. पेशाने वकील असलेली तारा म्हणजेच रश्मिका मंदाना रीतीरिवाजांपासून लांब आहे. आईच्या निधनाने तिच्या नाकात कापूस का घातला आहे? पाय का बांधले आहेत? असे अनेक प्रश्न रश्मिकाला पडले आहेत. आईच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान देखील ती कानात एअरपॉड घालून काम करत आहे. अमिताभ-नीना यांचा एक मुलगा दुबईत अडकला आहे. आईच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर तो बटर चिकनवर ताव मारत असल्याचं अमिताभला कळतं. एक मुलगा ट्रेकिंगला गेलेला असून अंत्यसंस्कार झाल्यानंतर तो घरी येतो. त्यामुळे या सिनेमाचं कथानक अनेक प्रश्न उपस्थित करणारं आहे.
'गुडबाय' या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी उत्तम काम केलं आहे. या सिनेमासाठी अमिताभ यांनी 100% मेहनत घेतली आहे. रश्मिका मंदानाची पुष्पातील श्रीवल्लीची इमेज या बदलवण्याचं काम या सिनेमाने केलं आहे. रश्मिकाची मॉर्डन भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. रश्मिका रीती रिवाजांपासून लांब असल्याने प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तिला उत्सुकता आहे. रश्मिकाचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असल्याचं चित्रपट पाहताना कुठेही जाणवत नाही. त्यामुळे पहिल्याच हिंदी सिनेमात तिने प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. खरंतर रश्मिकासाठी मी हा सिनेमा पाहिला. कारण तिच्या कामात नाविन्य आहे. पवेल गुलाटीनेदेखील चांगलं काम केलं आहे. तसेच या सिनेमातील सर्वच पात्रांनी चांगलं काम केलं आहे.
'गुडबाय' या सिनेमात प्रेक्षकांना कौटुंबिक नाट्य पाहायला मिळत आहे. सिनेमा चांगला असला तरी कुठेतरी या सिनेमापासून प्रेक्षक दुरावतो. अमिताभ आणि रश्मिकाच्या कामाचं कौतुक होत असलं तरी हा सिनेमा कुठेतरी कमी पडतो. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक भावूक व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. हा सिनेमा प्रेक्षकांना हसवण्यासोबत रडवतो देखील. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना कुटुंबाची आठवण येते. सिनेमाचं कथानक आणखी चांगलं असलं तर सिनेमा प्रेक्षकांना अधिक भावला असता. सिनेमा प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात कमी पडला आहे. याआधी अशापद्धतीचा 'तेरहवी' सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही खरचं तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर प्रेम करता का? असा प्रश्न सिनेमागृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना पडतो.
अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदानाचे तुम्ही मोठे चाहते असाल आणि कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारे सिनेमे तुम्हाला आवडत असतील तर 'गुडबाय' हा सिनेमा तुम्हाला नक्कीच आवडेल.
संबंधित बातम्या