GOAT Movie Review : विजय दक्षिणेतील मोठा स्टार असून हिंदीमध्येही तो बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. त्याचे बहुतेक चित्रपट टिपिकल मसाला चित्रपट असतात जे अडीच तीन तास प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात चांगलेच यशस्वीही होतात. विजयचा नवीन G.O.A.T (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) ही असाच निखळ मनोरंजन करणारा तीन तासांचा मसालेदार चित्रपट आहे. साऊथमध्ये हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत असून देशभरात काही ठिकाणी हिंदीतही रिलीज करण्यात आलेला आहे. विजयचा हा सेकंड लास्ट चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे विजयने स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला असून तो लवकरच संपूर्णपणे राजकीय क्षेत्रात उतरणार आहे. G.O.A.T. नंतर त्याचा अजून एक चित्रपट येणार आहे.
एम. एस. गांधी (विजय) एक स्पेशेल अँटी टेररिस्ट स्क्वॉडचा सदस्य आहे. स्वतःच्या कुटुंबीयांपासून लपवून तो देश वाचवण्याचे काम करीत असतो. अशाच एका केनियातील मोहिमेत देशद्रोही वैज्ञानिक मेननचे कुटुंब मारले जाते. त्यानंतर थायलंडमधील एका मोहिमेत गांधीच्या कुटुंबावर हल्ला होता. यात त्याचा लहान मुलगा मारला जातो. परंतु काही वर्षानंतर रशियामध्ये विजयची त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या तरुणाशी भेट होते. तो त्याचा मुलगा जीवन (विजय) असतो. तो विजयला घेऊन घरी येतो, त्यानंतर मात्र गांधीच्या टीममधील एकेका सहकाऱ्याची हत्या होण्यास सुरुवात होते आणि एकामागोमाग एका रहस्यांचा उलगडा होत जातो.
दिग्दर्शक वेंकट प्रभूनेच चित्रपटाची कथा लिहिली आहे. अशा प्रकारची कथा आपण अनेक वेळा पाहिली आहे. बाप आणि मुलामधील संघर्ष त्याने एका वेगळ्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा प्रयत्न काही अंशी यशस्वी झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण विजयच्या प्रेमात पडून म्हणा वा विजयची इमेज लक्षात घेऊन त्याने चित्रपट खूप लांबवला आहे. पण जवानचा दिग्दर्शक अॅटलीप्रमाणे त्याने चांगले काम केले आहे. फर्स्ट हाफ चांगलाच रंगतदार झाला असून सेकंड हाफही ठीकठाक आहे.
चित्रपटाचा क्लायमॅक्स आयपीएलमधील चेन्नई-मुंबई मॅचच्या पार्श्वभूमीवर आहे. असाच क्लायमॅक्स काही हॉलीवूडपटांचाही आहे. फुटबॉल स्टेडियमवर मॅच सुरु असताना नायक खलनायकाला कसा मारतो हे आपण हॉलिवूडपटात पाहिलेले आहे. पण वेंकट प्रभूने क्लायमॅक्स चांगला घेतला आहे.
विजयने एम.एस. गांधी आणि जीवन या दोन्ही भूमिका सफाईदारपणे साकारल्या आहेत. अॅक्शन सीनमध्ये विजयने कमाल केली आहे. अॅक्शन दृश्ये कमालीची झाली आहेत. बाकी कलाकारांमध्ये प्रभुदेवा, कोकल मोहन, जयराम सुब्रमण्यम, योगी बाबू, प्रशात त्यागराजन, स्नेहा प्रसन्न आणि मीनाक्षी चौधरीने आपले काम चोख बजावले आहे. दिवंगत अभिनेते विजयकांत यांना एआय तंत्रज्ञानाने जीवंत करण्यात आले आहे. चित्रपटाला संगीत युवान शंकर राजाने दिले आहे पण त्यात काही खास नाही.