Dunki Movie Review :  राजकुमार हिरानीने वेगळ्या विषयावर चित्रपट तयार करून ते प्रेक्षकांसमोर आणले, त्यात मनोरंजनाचा मसालाही होता  मग तो मुन्नाभाई असो, पीके असो, थ्री इडियट्स असो वा संजू, प्रेक्षकांनी ते चित्रपट डोक्यावर घेतले. त्यामुळे राजकुमार हिरानीचा चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळा आणि मनोरंजक असणार याची खात्री वाटत असते.


दुसरीकडे गेली काही  वर्षे यशाच्या प्रतीक्षेत असलेल्या शाहरुख खानने गेल्या वर्षी पठाण, नंतर यावर्षी जवानमुळे यशाची चव चाखली. त्यामुळेच राजकुमार हिरानी आणि शाहरुख जेव्हा डंकीसाठी एकत्र आले तेव्हा काही तरी वेगळे आणि चांगले पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासूनच प्रेक्षक डंकीची वाट पाहात होते. पण शरणार्थींचा मुद्दा प्रत्येक देशात मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक देशांमध्ये हा मुद्दा अत्यंत ऐरणीवर आला आहे. डंकीमध्ये हाच विषय मांडण्यात आला. मात्र डंकी पाहिला आणि राजकुमार हिरानी आणि शाहरुखने हे काय केले असा प्रश्न मनात उद्भवला. डंकी म्हणजे गैरमार्गाने, चोरून, लपून दुसऱ्या देशामध्ये नोकरी-व्यवसायासाठी जाणे. चित्रपटातील कथा 1995 मध्ये घडताना दाखवली आहे. पंजाबमधील एक तरुणी आणि तिच्या दोन मित्रांना लंडनला जायचे असते. लंडनला जाऊन पैसे कमवून गरीबी घालवायची असते. त्यासाठी लंडनला जाण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु होतात, पण व्हिसा मिळवण्यात ते अपयशी ठरतात. तेव्हा त्यांना लंडनला गैरमार्गाने घेऊन जाण्याची जबाबदारी शाहरुख खान उचलतो. तो हे काम करतो याचं अत्यंत तकलादू कारण चित्रपटात दाखवलंय.


शाहरुख भारतीय सैन्यदलातील एक सैनिक आहे त्याला भारताबद्दल प्रेमही आहे आणि तरीही तो या तिघांना लंडनला नेण्यासाठी गैरमार्गाचा वापर करतो, त्यांना तेथे घेऊनही जातो, मात्र लंडनच्या न्यायालयात तो भारताबद्दल प्रेम दाखवतो आणि पुन्हा भारतात येतो. त्याने लंडनला ज्यांना नेलेले असते ते तिघेही लंडनलाच राहातात. 25 वर्षानंतर त्याने लंडनमध्ये नेलेल्या त्याच्या त्या मैत्रिणीचा फोन येतो. तिला भारतात परत यायचे असते. ती आणि त्या दोन मित्रांना शाहरुख पुन्हा दुबईमार्गे भारतात घरी घेऊन येतो आणि डंकीचा प्रवास संपतो. 


खरे तर डंकीचा प्रवास जीवघेणा असतो हे अनेक घटनांमधून समोर आलेले आहे, परंतु राजकुमार हिरानीने चित्रपटात ते इतक्या सहजपणे दाखवले आहे की असे वाटते कोणीही उठून गैरमार्गाने परदेशात जाऊ शकतो. शाहरुखची सध्या अॅक्शन इमेज असल्याने त्याला एक फाईट सीनही राजकुमार हिरानीने दिलाय. चित्रपट पाहाताना मध्ये मध्ये थ्री इडियटचीही आठवण येते. फर्स्ट हाफमध्ये कॉमेडी आणि ट्रॅजेडी आहे जी फार कंटाळवाणी आहे. सेकंड हाफ थोडा सा ठीकठाक असून नंतर मात्र बोअर होतो आणि शेवट काय होणार हे आपल्याला कळून चुकते. शेवटी शेवटी तर भावुक होण्याऐवजी आपल्याला हसू येऊ लागते. सुरुवातीला शाहरुख जेव्हा पंजाबमधील पल्टू गावात येण्यासाठी ट्रेनमधून उतरतो तेव्हा त्याची एका व्यक्तीशी टक्कर होते आणि त्याच्या हातातील मिठाईचे डबे खाली पडतात, मात्र त्याचवेळेस राष्ट्रगीत सुरु होते म्हणून तो प्लॅटफॉर्मवरच तसाच उभा राहातो, त्याच्या हातातील पडलेली मिठाई ट्रेनमधील एक व्यक्ती उतरून घेऊन जाताना दाखवलेय. यातून शाहरुख किती देशभक्त आणि बाकीच्यांना देशभक्ती नाही ते दाखवण्याचा प्रयत्न हिरानीने केलाय. हे दृश्य अत्यंत बालीश वाटते.


राजकुमार हिरानीने यावेळी कथा आणि पटकथेवर नेहमीप्रमाणे गंभीरतेने लक्ष दिलेले नाही हे स्पष्टपणे जाणवते. शाहरुखच्या स्टारडम किंवा पठाणच्या यशाखाली राजकुमार हिरानी दबला असेल असे वाटत नाही. आमिर खानसोबत पीके आणि थ्री इडियट चित्रपट त्याने केलेलेच आहेत. अभिजात जोशी राजकुमार हिरानीचा आवडता पटकथा लेखक. अभिजात, कनिका धिल्लन आणि राजकुमार हिरानी यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे परंतु ती अत्यंत कमजोर झालीय. हिरानी टचही कुठे जाणवला नाही. राजकुमार हिरानी आपली जादू हरवून बसलाय की काय असा प्रश्न डंकी पाहाताना उद्भवतो. शाहरुख आणि तापसीची प्रेमकहानीही चित्रपटात आहे बरं.


शाहरुख खानने सैनिक हार्डीची भूमिका साकारलीय. त्याला दोन प्रकारच्या भूमिका साकारायला नेहमी आवडते. या चित्रपटातही तो तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही भूमिकांमध्ये दिसतो. त्याने हार्डीच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय पण तो त्यात अयशस्वी ठरलाय. त्याच्या तोंडी देशाबद्दल आणि शरणार्थींबद्दल दिलेले संवाद अत्यंत बालिश आणि तकलादू आहेत. त्या संवादांवर कोणीही टाळी वाजवणार नाही. हा शाहरुखच्या सगळ्याच गोष्टी ज्यांना चांगल्या वाटतात ते नक्कीच टाळ्या वाजवतील. 


तापसी पन्नूने गहाण घर सोडवण्यासाठी लंडनला जाण्याचसाठी आसुसलेल्या मनुची भूमिका ठीकठाक साकारलीय. तापसीही तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही भूमिकांमध्ये दिसलीय. तापसीचे मित्र असलेल्या आणि लंडनमध्ये जाण्यात उत्सुक असलेल्या बुग्गूची भूमिका विक्रम कोचरने आणि बल्लीची भूमिका अनिल ग्रोव्हरने बऱ्यापैकी साकारलीय. बोमन इरानीने इंग्रजीचे क्लास घेणाऱ्या गुलाटीची भूमिका साकारलीय.


विक्की कौशल पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असून त्याने सुखी नावाच्या तरुणाची भूमिका सााकरलीय. विकीने छोट्याशा भूमिकेत जान ओतलीय आणि त्याची भूमिका लक्षातही राहाते आणि हेच त्याचे यश आहे.
प्रीतमच्या संगीतात काही विशेष नाही. अमन पंतच पार्श्वसंगीत काही ठिकाणी चांगले वाटते.


ज्यांना राजकुमार हिरानीचे दिग्दर्शन आणि शाहरुखची इमेज पाहाण्याची इच्छा आहे त्यांना हा चित्रपट आवडणार नाही. किंवा शाहरुखच्या अॅक्शनची इमेज डोक्यात घेऊन चित्रपट पाहायला जाणाऱ्यांच्या हाती निराशाच लागेल.
आता तुम्ही ठरवा काय करायचे ते? पैसे वाचवायचे की वाया घालवायचे?