Chatrapathi Movie Review : आम्हाला काहीही दाखवाल आणि आम्ही ते पाहू असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. बॉलिवूड सिनेमांचे रिमेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाहीत, असं नाही. तर दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेकदेखील बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडतात. अशापद्धतीचे सिनेमे पाहिल्यानंतर प्रेक्षक मध्यंतरातच सिनेमागृहाबाहेर जातील.


'छत्रपती' हा तेलुगू सिनेमा 2005 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एस.एस. राजामौलींचा रिमेक आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राजामौली हे देशातील सर्वात मोठे सिने-दिग्दर्शक आहेत. पण आता 'छत्रपती'चा रिमेक पाहिल्यानंतर राजामौलीने या सिनेमाच्या निर्मात्यावर मानहानीचा डावा ठोकायला हवा. तसेच ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे त्यांना त्यांचे पैसे परत करायला हवेत. 


'छत्रपती' या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण या सिनेमाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना खूपच कंटाळा येत आहे. हा सिनेमा पाहताना 70 च्या दशकात गेल्यासारखं वाटतं. सिनेमा जसजसा पुढे सरकतो तसं या सिनेमावर पैसे खर्च केल्याचा तुम्हालाच राग येतो. पण तरीही प्रेक्षक या सिनेमात गुंतत जातो हे या सिनेमाचं यश आहे. 


प्रत्येकाला रॉकी भाई बनायचं आहे, हीच या 'छत्रपती' सिनेमाची गोष्ट आहे. एका ठिकाणी काम करणाऱ्या एका सामान्य मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमाचं कथानक एक आई, सावत्र भाऊ आणि शेकडो खलनायक यांच्यावर बेतलेली आहे. हा सिनेमा पाहताना एखादा जुना सिनेमा पाहिल्यासारखं वाटतं. मुळात या सिनेमाची कथा चांगली नसल्यामुळे सिनेमा खूपच रटाळ झालेला आहे. 


बेलमकोंडा श्रीनिवास मुख्य भूमिकेत


बेलमकोंडा श्रीनिवासने (Bellamkonda Sreenivas) 'छत्रपती' या सिनेमात छत्रपती नावाच्या एका मुलाची भूमिका साकारली आहे. पण प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडण्यात तो कमी पडला आहे. वाईट कथानकाचादेखील त्याच्या अभिनयावर परिणाम झाला आहे. नुसरत भरुचाचा हा पॅन इंडिया सिनेमा आहे. नुसरत एक उत्तम अभिनेत्री असली तरी या सिनेमातील तिचं काम चांगलं झालेलं नाही. शरद केळकरसारखा हरहुन्नरी अभिनेतादेखील या सिनेमात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. 


'छत्रपती' हा सिनेमा 2005 साली खूप चालला. पण आज काळ बदलला आहे. त्यामुळे या सिनेमाची निर्मिती करण्याआधी निर्मात्यांनी खूप विचार करायला हवा होता. गावकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा छत्रपती कसा वाईट मार्गाला लागतो ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.