Captain Miller : इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यापूर्वी आणि भारतीय जनतेवर अत्याचार करण्यापूर्वी भारतातील राजे महाराजे देशावर राज्य करीत होते आणि देशातील जनतेवर अनन्वित अत्याचार करीत होते. आदिवासी आणि मागास समुदायाला या राजे -महाराजांनी आपल्या कामासाठी वापरून घेतले पण त्यांना मुख्य प्रवाहात येऊ दिले नाही. हिंदी चित्रपटांमध्ये हा विषय क्वचितच कोणी तरी हाताळला असेल पण दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये हा विषय अनेकदा हाताळण्यात आला आहे. आणि आता 'कॅप्टन मिलर'च्या (Captain Miller) रुपात पुन्हा एकदा हा विषय पडद्यावर मांडण्यात आलेला आहे. आरआरआरमध्ये रामचरण इंग्रजांच्या बाजूने लढताना भारतीयांवर अत्याचार करतो, त्यामागे एक कारण असते. कॅप्टन मिलरही अगोदर इंग्रजांच्या बाजूने क्रांतिकारकांवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारतो. पण नंतर त्याचे मन बदलते आणि तो इंग्रजांविरोधात उभा राहतो. एका छोट्या गावात राहाणार इसा कॅप्टन मिलर कसा बनतो त्याची ही कथा.


'कॅप्टन मिलर'चं कथानक काय? (Captain Miller Movie Story)


तामिळनाडूमधील एक छोट्याशा गावात आदिवासी राहात असतात. त्या गावात तेथील राजा (जयप्रकाश) मंदिर बांघतो मात्र गावातील आदिवासींना मात्र मंदिरात येण्यास मनाई करतो. देवाचे दर्शनही घेऊ देत नाही. याच गावात ईसा (धनुष) मोठा भाऊ सेंगेनन (शिव राजकुमार) आणि आई (विजी चंद्रशेखर) सोबत राहात असतो. ईसाचा भाऊ सेंगेनन क्रांतिकारी असतो आणि इंग्रजांविरोधात लढत असतो तर स्वतःची ओळख निर्माण व्हावी, भेदभावापासून दूर राहावे म्हणून ईसाला ब्रिटिशांच्या सेवेत जायचे असते. आणि तो जातोही. 


ईसा नाव उच्चारायला कठिण असल्याने ब्रिटिश ईसाला मिलर नाव देतात. ब्रिटिशांकडून ट्रेनिंग घेतल्यानंतर एक दिवस त्यांना एका मोहिमेवर पाठवले जाते. ती मोहीम असेत क्रांतिकारकांना ठार मारण्याची. स्वतःच्याच भाईबंदांना मारण्यास इसा तयार नसतो परंतु वरिष्ठांचा आदेश पाळत तो गोळीबार करतो. मृतदेह पाहून त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होते आणि तो गोळीबाराचे आदेश देणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करतो आणि पळून जातो.


ईसा गावात परत येतो पण गाववालेही त्याला गावात घेत नाहीत. कारण त्यांनी केलेल्या गोळीबारात ईसाचा क्रांतिकारी भाऊ सेंगेननही ठार झालेला असतो. ईसा जंगलात एकटाच राहू लागतो. जंगलात राहात असताना ईसा उर्फ़ मिलर इंग्रजांना लुटणाऱ्या डाकूंच्या टोळीला मदत करतो आणि नंतर त्यांच्यासोबतच राहू लागतो. मिलरला वाँटेड जाहीर केले जाते आणि त्याच्यावर १० हजार रुपयांचे बक्षीस लावले जाते. त्याचे नाव केवळ मिलर लिहिले म्हणून रागावलेला ईसा इंग्रज अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठार मारतो. 'कॅप्टन मिलर' नाव लिहावे असे त्याला वाटत असते.


त्यानंतर मिलर क्रांतिकारकांची मदत करू लागतो. मात्र मिलरच्या प्रतापामुळे इंग्रज तो ज्या गावात राहात असतो तेथील गावकऱ्यांवर अत्याचार करू लागतात. मग ईसा ऊर्फ मिलर इंग्रजांच्या आणि राजाच्या तावडीतून गावकऱ्यांना कसा मुक्त करतो, त्यांना मंदिरात कसा प्रवेश मिळवून देतो, या कामी त्याला कोण आणि कशी मदत करते त्याची कथा म्हणजे कॅप्टन मिलर. चित्रपटाच्या शेवटी याच्या पुढील भागाचेही सूतोवाच करण्यात आले आहे.


‘कॅप्टन मिलर’ कसा आहे?


संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी झालेला आहे. चित्रपटात अॅक्शन दृश्ये कमालीची झाली आहेत. 'कॅप्टन मिलर' आणि त्याची टीम इंग्रजांच्या ट्रकवर हल्ला करून देवाची मूर्ती सोडवण्याचा प्रयत्न करतात ते दृश्य खूपच जबरदस्त झालेले आहे. क्लायमॅक्समध्ये असाच जबरदस्त झाला आहे.


धनुषने कॅप्टन मिलरची भूमिका खूपच जबरदस्त साकारली आहे. सुरुवातीचा लाजरा बुजरा तरुण ते नंतर सहजासहजी हत्या करणारा कॅप्टन मिलर असा प्रवास त्याने चांगला दाखवला आहे. धनुष प्रत्येक भूमिकेत आपली जान ओतण्याचा प्रयत्न करतो आणि ती भूमिका पडद्यावर खरी कशी वाटेल याची पूर्ण काळजी घेतो म्हणूनच तो कोणत्याही भूमिकेत फिट वाटतो. धनुषने कॅप्टन मिलरला न्याय दिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


कलाकारांच्या अभिनयाची कमाल


शिवा राजकुमारने क्रांतिकारी सेंगेननची भूमिका जोरकसपणे साकारली आहे. त्याच्या वाट्याला फार कमी दृश्ये आलीत, पण त्यात त्याने जान ओतलीय. कदाचितच चित्रपटाच्या दुसऱ्या भागात त्याला मोठी भूमिका असेल. नायिका वेलमथीची भूमिका प्रियांका अरुल मोहनने चांगल्या प्रकारे साकारली आहे. वेलमथीच्या भूमिकेत ती सूट झालीय.  आदिती बालनने शकुंतलाची भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे.


चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अरुण मथेश्वरनने केले आहे. एक चांगली कथा आणि तितकेच चांगले दिग्दर्शन केल्याबद्दल अरुणचे अभिनंदन करावे लागेल. चित्रपटाची पटकथाही त्याने मदन कर्कीसोबत लिहिली आहे. त्यामुळे चित्रपट कसा घ्यायचा हे त्याने अगोदरच ठरवलेले असल्याने अगदी तसाच चित्रपट पडद्यावर दिग्दर्शकाने उतरवल आहे. 


जी. व्ही. प्रकाशकुमार यांनी दिलेले संगीत चित्रपटाला एक वेगळी उंची प्रदान करते. हिंदीत गाणी आणि संवाद खूपच चांगले झालेले आहेत. धनुषचा अभिनय, अरुण मथेश्वरनचे दिग्दर्शन आणि जरा वेगळी कथा पाहायची असेल तर कॅप्टन मिलरला भेट देण्यास हरकत नाही.