उजाड माळरानावर शुष्क फुफाट्यात चार सहा फुटाच्या खड्ड्यातलं गढूळ पाणी एक म्हातारी घागरीत भरत आहे. हे दृश्य पाहून आपल्याला म्हातारीची दया येते. तेवढ्यात कॅमेरा वाईड होतो आणि जे चित्र दिसतं ते बघून तुम्ही हलून जाता. तिथे शेजारी आणखी आठ दहा बायका रिकाम्या घागरी घेऊन बसलेल्या असतात. ती दृश्य स्क्रीनवर गायब होत जातात. पण म्हातारीच्या घोट घोटभर पाणी घागरीत ओतण्याचा आवाज येत राहतो. इथेच सिनेमा संपतो. 


'कूळंगल' ही एका कुटुंबाची कथा. दारूच्या नशेत रोज मारझोड करणाऱ्या नवऱ्याला कंटाळून माहेरी निघून गेलेल्या महिलेची गोष्ट, आईला परत आणण्यासाठी बापासोबत पायपीट करणाऱ्या आणि लहानपण हरवलेल्या मुलाची गोष्ट. बायकोला पायातली वाहान समजणाऱ्या पुरूषी अहं दुखावल्यानं सुडानं पेटून उठलेल्या मस्तवाल नवऱ्याची गोष्ट. ही बाई या नवऱ्याला कंटाळून अनेकवेळा माहेरी गेलेली आहे. हा सिनेमा तिच्या वैराण आयुष्यातला एक कोरडा दिवस आहे. अत्यंत साध्या सरळ पद्धतीनं आपल्यासमोरून सिनेमा सरकत जातो. ओढून ताणून समस्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. शोधाल तेवढे सामाजिक प्रश्न प्रत्येक फ्रेममधून दिग्दर्शक विनोथराज मांडत जातात. 


शीघ्रकोपी बाप गणपती आणि मुलगा वेलू यांचा हा  एक प्रवास आहे. तमिळनाडूच्या मदुरईजवळच्या अरिट्टपटी या दुर्गम गावातली ही कथा केवळ प्रातिनिधीक आहे. गणपती आणि एका व्यक्तीचं बसमध्ये जोरजोरात भांडण होतं. गाडीमध्ये आपल्या चिमुकलीला घेऊन प्रवास करणारी महिला दाखवली आहे. त्या गोंधळाचा छोट्या बाळाला त्रास होतो. नंतर ती महिला मध्येच बसमधून उतरून जाते. अत्यंत प्रभावी दृश्यांमधून महिलांचं समाजातलं स्थान दिग्दर्शक दाखवतो. याच बसमध्ये पाण्यानं भरलेल्या तीन घागरी घेऊन प्रवास करणारी म्हातारी दिसते. 


 दुसरीकडे आग ओकणाऱ्या उन्हात खडकाळ भागात उंदिर पकडून आपलं उदरभरण करणारं कुटुंब मूळ कथेसोबत जोडलं जातं. परतीच्या प्रवासात वेलूची शिक्षिका स्वतः दुचाकी चालवत येते, मागे तिचा पती बसलेला दाखवलाय. गणपतीला सांगून ते दोघे वेलूला गाडीवर बसवून घरापर्यंत सोडतात. शिक्षणातून स्वावलंबी असलेली महिला दाखवून समाजातली वैचारीक दरी या दृश्यातून दिग्दर्शक मांडतो. अर्थात यातही तो काही लादत नाही. प्रत्येकानं त्या कृतीचा आपापला अर्थ काढावा इतकी सहजता या सिनेमात आहे. 


कौटुंबिक हिंसाचार, शिक्षणाचा अभाव, ग्रामीण भागातले कच्चे रस्ते, पाण्याचं दुर्भिक्ष, गरीबीतून आलेलं कुपोषण, अशिक्षितपणामुेळे वाढलेला अविवेक असे अनेक पदर या सिनेमाला आहेत. सगळ्या फ्रेम्सवर साज चढवलाय युवान शंकर राजा यांच्या संगितानं. सिनेमॅटोग्राफर विग्नेश कुमुलई आणि जेया पार्थिबन यांचं विशेष कौतूक वाटतं, कारण हा सिनेमा त्यांच्या नजरेचा आहे. गणपतीच्या भूमिकेत कुरूथथंडैय्या आणि वेलूच्या भूमिकेत छेल्लापंडी या बालकलाकारानं अजिबातच अभिनय न केल्यानं हा सिनेमा अधिक खरा वाटतो.


तमिळ सिनेमाची वैभवशाली परंपरा आहे. मनोरंजनमुल्य अबाधित ठेवून सामाजिक प्रश्नांची अलगद उकल करण्यात तमिळ सिनेमा कायम अग्रेसर राहिलाय. कूळंगल कदाचित तुमचं मनोरंजन करणार नाही, मुळात तो मनोरंजनासाठी पाहूच नये. कुठलाही संवाद नसलेली लांबलचक दृश्यं बघून तुम्हाला कंटाळा येईल. काटे, दगड, फुफाटा, माती, रापलेले चेहरे, डोळ्यांना सुखावणारं एकही चित्र तुम्हाला बघायला मिळणार नाही. कूळंगल हा प्युअर सिनेमा आहे. सिनेमा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात. कूळंगल बघितल्यावर ते पटतं. पहिलाच सिनेमा असूनही तद्दन व्यावसायिक सिनेमा न बनवता काहीतरी क्रांतीकारी करून पाहणाऱ्या दिग्दर्शक विनोथराज अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहे. माझी अत्यंत आवडती अभिनेत्री नयनथारा आणि तिचा पती विग्नेश शिवान यांना या सिनेमाची निर्मिती व्हावी असं वाटणं हे सिनेजगासाठी शुभसंकेत आहेत. देशविदेशातले फिल्म फेस्टिव्हल्स गाजवल्यानंतर, भारताकडून यंदाच्या ऑस्करसाठी 'कूळंगल'ची निवड झालीय. अभिनंदन टीम 'कूळंगल'

अमोल किन्होळकर यांचे इतर लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...