माणसाच्या मनाचा थांग लागणं महाकठीण. एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीमध्ये तशी का वागते? एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल अमुक पद्धतीचाच विचार का करते या एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल कोड्यात टाकणाऱ्या अनेक शंकाकुशंकांना असलेलं उत्तर बऱ्याचदा त्याच्या भूतकाळात दडलेलं असतं. भूतकाळ.. जो फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतो. त्या भूतकाळाच्या मुशीतून व्यक्तीच्या वर्तनाला आकार येतो. जगण्याला चिकटून राहिलेला पश्चात्ताप, पदरी आलेली हतबलता नक्की कुठून आली हे ती व्यक्तीच जाणत असते. मग तिथून सुरू होतो मानसिक घुसमटीचा खेळ. पण मनावरची ही वाढती सूज कमी करायची तर त्यासाठी संवाद साधता येण्यासारखं आणखी कोणीतरी भेटावा लागतं. कारण, आता सहनही होत नसतं आणि सांगता तर त्याहून येणारं नसतं. अशी व्यक्ती हवी असते, जिचा आपल्या भूत-वर्तमान-भविष्याशी काही संबंध आजही नसेल आणि पुढेही कधी येणार नाही. घटना घडून गेल्यानंतर जबाबदारीचा झालेला साक्षात्कार भीषण असतो. पश्चात्तापाच्या आगडोंबात भाजून निघणाऱ्या दोन व्यक्ती अपघाताने एकमेकांसमोर येतात आणि मग मनात रुतून बसलेल्या काट्याची जखम अनाहूत भळभळू लागते. त्या जखमेच्या गंधाची ही गोष्ट आहे. जून!


औरंगाबादमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा नील पुण्यातलं इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून घरी आलाय. एकिकडे वर्ष डाऊन असल्यामुळे नीलवर ताण आहे. आणखीही काहीतरी त्याच्या मनात आहे खरं. पण ते सांगण्यासारखी स्थिती आत्ता नाही. तो राहात असलेल्या सोसायटीत एके दिवशी नेहा येते. सोसायटीत पूर्वी राहणाऱ्या अभिजीतची नेहा बायको. आपल्याच तंद्रीत असलेला नील आणि नव्याने सोसायटीचा पत्ता शोधत आलेली नेहा यांची पहिली गाठ पडते तीच गैरसमजुतीतून. नील आणि नेहा दोघांचे स्वभावही एक घाव दोन तुकडे करू पाहणारे. वरवर शीघ्रकोपी असले तरी आतून वेदनेने दुखावलेले. गैरसमजुतीतून झालेल्या ओळखीचं रुपांतर हळूहळू मैत्रीत होतं. ही मैत्री घनिष्टही नाही. त्या परिस्थितीत दोघे एकाच नावेत असल्याचा अंदाज आल्यानंतर होणारी ही मैत्री. तिथून पुढे नील आणि नेहा एकमेकांवरच्या जखमेवरची खपली कसे होतात त्याची ही गोष्ट आहे. 


या गोष्टीला अनेक पदर आहेत. यात इतर व्यक्तिरेखाही आहेत. चित्रपटात नेहाच्या संवादातून.. दृश्यातून डोकावणारा अभिजीत आहे. नीलसोबत असणारे त्याचे आई-बाबा, प्रतीक निक्की आहेत. या प्रत्येकाची आपली स्टोरी आहे. अर्थात ती असायला हवीच. कारण, प्रत्येक माणसाच्या 'तशा असण्या'मागे त्याची अशी एक स्टोरी असतेच. या सगळ्यांची गोळाबेरीज होत होत जून तयार झाला आहे. म्हणूनच यातल्या सगळ्या व्यक्तिरेखा आवश्यक तर आहेतच पण त्या लक्षातही राहतात. किरण करमरकर, रेशम, श्रीवर्धन, निलेश दिवेकर आदी प्रत्येकाचीच कामं उत्तम आहेत. प्रत्येकाचं वर्तन अधोरेखित होतं. यात नील आणि नेहा वठवलेले सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे-बायस यांनी हा सिनेमा पुरता पेलला आहे. अनेक इंटेन्स सीन दोघांनी कमाल वठवले आहेत. नेहा पेंडसेने आपल्या अग्निदिव्य या पहिल्या-वहिल्या सिनेमात अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर नेहा जे चित्रपट करत आली त्यातून ती नटी म्हणून एस्टॅब्लिश झाली. पण अभिनयाला वाव मिळत नव्हता. बऱ्याच काळानंतर या चित्रपटात अभिनेत्री नेहा दिसते. अभिजीतकडून वारंवार झालेला अपेक्षाभंग नीलजवळ सांगताना.. नीलला समजून घेणारी नेहा.. जयस्वालने बोलता बोलता वर्मावर बोट ठेवल्याने आतून कोलमडून गेलेली नेहा.. बऱ्याच काळानंतर नेहाने बॅट हातात घेतल्याचं फिलिंग सिनेमा पाहताना येतं. नेहासोबत सिद्धार्थ मेननलाही यात बॅटिंग करायला दिग्दर्शकांनी पूर्ण स्कोप दिला आहे. वडिल, मैत्रीण, मित्र, पुण्यातले मित्र.. नेहा.. आणि त्यानंतर पुन्हा वडिलांसोबत असलेलं संभाषण.. हे वर्तुळ सिद्धार्थने ताकदीने पूर्ण केलं आहे. दोघांनी केलेला संयत, सूक्ष्म अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू.


सिनेमातं छायांकन, संकलन, पार्श्वसंगीत, संगीत या सर्व बाजू उत्तम सांभाळल्या गेल्या आहेत. हा वारा हे गाणं सुरेख जमलं आहे. बाबा हे गाणं ऐकायला ताजं वाटतं. ही उत्तम भट्टी जमून यायला कारणीभूत ठरलेले अर्थातच दोन दिग्दर्शक सुह्रद गोडबोले आणि वैभव खिस्ती. सिनेमाची कसून बांधलेली गोष्ट.. त्याची तितकीच नेटकी पटकथा.. सोपे पण ठाव घेणारे संवाद..या लेखनावर दिग्दर्शकांनी पुरेशी रेखीव इमारत बांधली आहे. म्हणूनच हा सिनेमा आपली छाप सोडतो. चित्रपटाची सुरूवात प्रत्येकाच्या घुसमटीतून होत असली तरी सिनेमा संपल्यानंतर ऊर भरून घेता येणारा श्वास हे या चित्रपटाचं यश म्हणावं लागेल. हा चित्रपट जरूर वेळ घेऊन पहा. 


पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळतायत चार स्टार. स्वच्छ.. नेटका.. पारदर्शी आणि तितकाच सूक्ष्म.. जून.