Bhirkit Movie Review : भिरकीट… अनुप जगदाळे याने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा. आवर्जून पाहायला हवी अशी गावाकडची हसवणारी, रडवणारी आणि अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
'भिरकीट' हा सिनेमा पाहाताना मला शंकर पाटील, आप्पासाहेब खोत, द.मा. मिरासदार अशा दिग्गजांच्या ग्रामीण कथा पडद्यावर जिवंत झाल्यासारखं जाणवतं होतं. त्यांच्या कथेतली इरसाल, हळुवार, बेरकी, रांगडी पात्रं भिरकीटमधून आपल्याशी बोलतायत असं वाटत होतं. पश्चिम महाराष्ट्रातले विनोदी ग्रामीण कथाकार हिंमत पाटील यांची ‘शवयात्रा’ नावाची कथा प्रसिद्ध आहे. ‘भिरकीट’ पाहाताना राहून राहून त्या कथेची आठवण येत होती. अर्थात ‘भिरकीट’ची गोष्ट संपूर्णपणे स्वतंत्र आहे. तरीही हे सांगण्यामागचा हेतू एवढाच की गावाकडची गोष्ट म्हणून ‘भिरकीट’ हे प्रकरण कमालीचं जमून आलं आहे.
गावाकडच्या गमती-जमती, राजकीय रस्सीखेच, भावकीतला गुंता, बांधावरची भांडणं हे सगळं या सिनेमात येतंच पण त्याही पुढे जाऊन हा सिनेमा मुल्यांचा होत असलेला ऱ्हास, माणुसकीचा होता असलेला अंत आपल्यापुढे मांडतो. जे अत्यंत अस्वस्थ करणारं आहे.
सिनेमाची एकंदर गोष्ट पाहता तो पसरट होण्याची जास्त शक्यता होती मात्र तो अत्यंत, अत्यंत काटेकोरपणे बांधला गेलाय. आणि त्यासाठी दिग्दर्शकाचं करावं तेवढं कौतुक थोडंच.
‘भिरकीट’ या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे अचूक पात्र निवड. जिथं कलाकारांची निवड झाली तिथंच दिग्दर्शकाने अर्धी लढाई जिंकली, हे सिनेमा पाहाताना क्षणोक्षणी जाणवतं.
गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, सागर कारंडे, कुशल बद्रिके, तानाजी गालगुंडे, राधा सागर, कैलाश वाघमारे, शिल्पा ठाकरे, मीनल बाळ, दिप्ती धोत्रे आणि उषा नाईक अशा साऱ्याच कलाकारांनी कमाल कामं केली आहेत.
उषा नाईक यांनी ज्या पद्धतीने यातली आजी साकारली आहे त्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. संपूर्ण सिनेमात अगदी 4-5 वाक्यं त्यांच्या वाट्याला आली असतील. मात्र त्या डोळ्यांमधून जे तो त्यांच्या आजवरच्या सर्वोत्तम कामाची जर यादी करायची झाली तर 'भिरकीट' हा वरच्या क्रमांकावर असेल यात शंका नाही.
सिनेमाची गोष्ट ग्रामीण भागातली, एका छोटाशा खेड्यात घडणारी आहे. तिथल्या भाषेचा गोडवा, वागण्या-बोलण्यातले बारकावे सारं काही या मंडळींनी हुबेहुब टिपलं आहे. आणि ते सहज आलंय. कुठेही कृत्रिम वाटत नाही. थोडक्यात आवर्जून पाहायला हवा असा हा सिनेमा आहे.