Jaggu Ani Juliet Review: एक खूप छान वाक्य मी वाचलं होतं. ते वाक्य असं होतं की एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. मला वाटतं ती उत्तरं सापडण्याची गोष्ट म्हणजे जग्गु आणि ज्युलिएट हा सिनेमा.  केवळ प्रेमकथेपुरता हा सिनेमा अजिबात मर्यादित नाही. त्या पलिकडे जाऊन खूप काही सांगण्याचा, मांडण्याचा प्रयत्न हा सिनेमा करतो. अर्थात ते समजून घेण्याची जबाबदारी प्रेक्षक म्हणून आपली असते. 


आपण सगळेच रुटिनमध्ये जगत असतो. तिच माणसं, तिच कामं, तेच प्रश्न आणि तेच झगडणं. या साऱ्यातून स्वत:ला ब्रेक देण्याची नितांत गरज असते. जे रितं झालंय ते पुन्हा एकदा भरुन घेण्याची आवश्यकता असते. आणि ते सारं घडतं ते प्रवासात. या प्रवासातला 'मी टाईम' खूप काही देऊन जातो. खूप काही शिकवून जातो आणि कधी कधी नवी नातीही जन्माला घालतो. जग्गु आणि ज्युलिएट पाहाताना त्याची अनुभूती आपल्याला येते. 


सिनेमा कलरफुल आहे. त्यासाठी निवडलेली लोकेशन्स मुळात सुंदर आहेतच मात्र  महेश लिमयेंच्या कॅमेऱ्यातून ते सारं पाहाताना डोळे सुखावतात. कौतुक यासाठीच की कुठेही प्रेमात पडून त्या गोष्टी आपल्या समोर येत नाही. दृश्यचौकटी कथेला डोईजड होऊ नयेत याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. 


अजय-अतुल यांचं संगीत आपल्यासाठी नेहमीच पर्वणी असते. जग्गु आणि ज्युलिएटला चढलेला त्यांच्या सुरांचा साज हा सर्वार्थाने वेगळा आहे. खास करुन मना आणि कधी ना तुला ही दोन गाणी कमाल आहेत. गंमत म्हणजे ते सूर प्रत्येक वेळी ऐकताना एक नवा अनुभव तुम्हाला देतील.  


अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी या दोघांनीही आपली जबाबदारी पुरेपूर पेलली आहे. प्रेमाचे, मैत्रीचे, कौटुंबिक नात्याचे  वेगवेगळे पदर त्यांनी तितक्याच ताकदीने उलगडले आहेत. जास्त भावते ती त्यांच्यातली सहजता. अमेयचा आगरी बाणा ‘जग्गु’ला न्याय देणारा आहे. तर वैदेहीचं एक वेगळं रुप या सिनेमात आपल्याला दिसतं.


बाकी उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले,  अविनाश नारकर, सुनील अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार, जयवंत वाडकर, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे आणि मनोज जोशी अशी मोठी स्टारकास्ट या सिनेमात आहे. मात्र त्यांच्या भूमिका अजून चांगल्या पद्धतीनं मांडता आल्या असत्या. 


जसं मी सुरुवातीला म्हणालो ही प्रवासाची गोष्ट आहे आणि त्या प्रवासाच्या निमित्तानं निमित्तानं भेटणाऱ्या माणसांची आणि त्यांच्या नात्याची गोष्ट आहे. त्यात अर्थातच जग्गु आणि ज्युलिएटचा ट्रॅक मुख्य असला तरी त्यातला प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे. कदाचित त्यांच्यात आपलंही प्रतिबिंब दिसू शकेल. 


महेश लिमयेंनी सिनेमेटोग्राफर आणि दिग्दर्शक अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम पार पाडल्या आहेत. तुलना नाही पण त्यांच्यातल्या दिग्दर्शकाने कमाल केली आहे ती क्लायमॅक्सला. सिनेमाचा शेवट अशा काही उंचीवर नेला आहे की मग आधी खटकलेल्या काही गोष्टी आपण विसरुन जातो.


थोडक्यात निर्माते पुनीत बालन यांनी एका मराठी सिनेमासाठी जो कॅनव्हास त्यांना उपलब्ध करुन दिला त्यावर तितकीच चांगली कलाकृती रेखाटण्याचा महेश लिमेय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. जग्गु आणि ज्युलिएटच्या या प्रेमकथेला मी देतोय तीन स्टार्स...