मुंबई : सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या या आरोग्य दिनाला मोठं महत्त्व आहे. निसर्ग याच काळात निरनिराळ्या रसाळ फळांचा आपल्यावर वर्षाव करुन एकप्रकारे सूचित करत असतो, आपण मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करुन  रस्त्यावरच्या स्टॉलवर लिंबू सरबत, फळांचे रस, मिल्क शेक असं बरंच काही पितो आणि आजारी पडतो. याला एक सुंदर, चविष्ट पर्याय म्हणजे घरच्या घरी, रसाळ फळांपासून स्वतः तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स पिणं.

हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टलचे शेफ ब्लेस परेरा यांनी हेल्थ ड्रिंक्स सांगत आहेत की जी तुम्ही एकदा चाखली तर पुन्हा पुन्हा पितच राहाल! ही ड्रिंक्स कमीतकमी साहित्यात झटपट तयार करता येतात आणि तुमच्या आरोग्याचीही पुरेपूर काळजी घेतात.

1ब्लू बेरी अँड मिंट स्मूदी 

वेगवेगळ्या प्रकारच्या चेरीज कोणाला नाही आवडत? त्यातही चेरीजची स्मूदी म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांत पर्वणीच! त्यामुळे ब्लू बेरी अँडमिंट स्मूदी तुम्ही चाखून पाहाच.

साहित्य : 1 कप ताज्या ब्लू बेरीज, 1/2 कप काळ्या चेरीज थोड्या कुस्करुन, दहा पुदिन्याची पाने, 1/2 कप लो फॅट योगर्ट, बर्फाचे दोन-तीन खडे, आवश्यकतेनुसार साखर.

कृती : वरील सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्या. यम्मी, टेस्टी आणि हेल्दी स्मूदी तयार!



2मँगो एनर्जायझर 

आंबा हा फळांचा राजा. उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच सर्वांना वेध लागतात ते आंब्याचे. आमरस, आम्रखंड, मँगोशेक हे नेहमीचे पदार्थ.  पण या आंब्यापासून तयार होणारं एक सोपं आणि अत्यंत चविष्ट पेय म्हणजे मँगो एनर्जायझर.

साहित्य : एक कप बाठा काढलेला, सोललेला आंबा, एक मध्यम आकाराचे सोललेले केळे, एक कप ताज्या स्ट्रॉबेरीज, 3-4 बर्फाचे खडे  आणि गरजेनुसार साखर

कृती : सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्या. लालसर-पिवळ्या रंगाची पातळ पेस्ट झाली की हे एनर्जायझर प्यायला घ्या.  ग्लासाच्या कडेवर एक स्ट्रॉबेरीचा काप लावा. जिभेच्या चोचल्यांसोबत थोडे नेत्रसुखही!



3आईस ग्रीन टी, (आलं - पुदिन्यासोबत

आजकाल फिटनेस जपणारे अनेकजण चहाचा त्याग करुन ग्रीन टीकडे वळले आहेत. उन्हाळ्यात तसाही गरम चहाचा कंटाळाच येतो.  पण हीच ग्रीन टी तुम्हाला गारेगारही पिता येईल.

साहित्य : एक इंच आले बारीक चकत्या करुन घ्या, 7-8 पुदिन्याची ताजी पाने, एक ग्रीन टी चे पाकीट, एक चमचा मध, 1/2 चमचा  लिंबाचा रस आणि एक कप पाणी

कृती : एका पातेल्यात कपभर पाणी घेऊन त्यात आल्याचे तुकडे टाकून मोठ्या आचेवर उकळी आणा. गॅस बंद करुन त्यात पुदिन्याची पाने आणि ग्रीन टीचे पाकीट टाका. 15 मिनिटे झाकणबंद ठेवा. मग हे पाणी दुसऱ्या भांड्यात काढा. त्यात मध आणि लिंबू रस घाला, ढवळा  आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. गारेगार प्या.



4गारेगार टर्मरिक आईस टी 

'पी हळद अन हो गोरी' ही मराठीतली प्रचलित म्हण. पण हळद गोरेपणापलीकडे एकूणच आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. हळदीत कॅन्सरशी लढण्याची क्षमता आहे, पचनसंस्था, मेंदू आणि हृदय यांचेही आरोग्य हळद राखते, म्हणूनच आरोग्याप्रती जागरुक लोकांनी  उन्हाळ्यात ही टर्मरिक आईस टी रोज प्यावी.

साहित्य : दोन कप पाणी, एक इंच आले-बारीक चिरलेले, 2 चमचे हळद पूड, 1 ग्रीन टी पाकीट, चिमूटभर मीठ, कपाचा चौथा भाग मध.

कृती : एका पातेल्यात पाण्याला उकळी येण्याच्या जरा आधी आले, हळद, मध आणि मीठ टाका. दहा मिनिटे उकळून गॅस बंद करा.  ग्रीन टी पाकीट त्यात सोडून 3 मिनिटे झाकणबंद ठेवा. मग पाणी गाळून घ्या आणि सर्व्हिंग ग्लासात 3-4 बर्फाचे खडे टाकून त्यावर तयार  हळदी चहा ओता. वरुन मध, लिंबू रस टाका आणि गारेगार प्यायला द्या. देताना ग्लासाच्या कडेवर  लिंबाचे काप लावायला अर्थातच  विसरु नका!


5. ग्रीन स्मूदी विथ चिया सीड्स


आतापर्यंत आपण ड्रिंक्समध्ये फळांचा उपयोग पाहिला, पण हिरव्या भाज्या आणि अत्यंत पौष्टिक अशा काही बियांचा समावेशही हेल्थ ड्रिंकमध्ये करता येतो तो असा

साहित्य : एक कापलेले ग्रीन अॅप्पल, एक कप केळं भाजीची चिरलेली पाने (कडक भाग वगळून), 50 ग्रॅम संत्र्याचा थंड ज्यूस, 1/2 कप थंड पाणी, 1/2 कप थंड पाण्यात 15 मिनिटे भिजवलेल्या चिया सीड्स आणि एक टेबलस्पून अंबाडीच्या बिया इ.

कृती : ग्रीन अॅप्पल, केळं भाजी, संत्र्याचा ज्यूस आणि अंबाडीची बिया अर्धा कप पाण्यासोबत ब्लेंड करा. यात भिजवलेल्या चिया सीड्स टाका आणि स्मूदी नीट ढवळून थंडगार प्यायला द्या.