पुणे : 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी लग्न करुन त्याचे पैसे आणि फ्लॅट बळकावल्याची घटना पुण्यात घडली आहे. वृद्धाची फसवणूक करणाऱ्या 35 वर्षीय महिलेसह तिघांना अटक केली आहे. तर पोपटलाल गांधी असं फसवणूक झालेल्या वृद्धाचं नाव आहे.


पोपटलाल गांधी घरात एकटेच राहत होते. त्यांना सोबतीची गरज होती म्हणून एका मध्यस्थीने त्यांची ओळख महिलेशी करुन दिली. या महिलेने पहिल्या नवऱ्याला सोडचिठ्ठी दिल्याची खोटी कागदपत्रं पोपटलाल गांधी यांना दाखवली. त्यानंतर दोघांनी पुण्याच्या मॅरेज ब्युरोमध्ये जाऊन लग्नही केलं.

परंतु लग्नाच्या दोनच दिवसांनी महिलेने तिच्या पहिल्या नवऱ्याला घरात बोलावलं. पतीने पोपटलाल गांधी यांना मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे आणि फ्लॅटचा ताबा मिळवला आणि गांधी यांना हाकलून दिलं.

हा प्रकार गांधी यांच्या नातेवाईकांना कळला. पोपटलाल गांधी यांनी नातेवाईकांच्या मदतीने सहकार नगर पोलिस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीसह महिलेसह, तिचा पहिला पती आणि बनावट कागदपत्रं बनवून देणारा वकील यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, या महिलेने याआधीही अशा प्रकारची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.