Women Safety : महिलांना अनेक वेळेस विविध परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. सध्या घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता महिलांनी सतर्क राहण्याची गरज आहे. नुकतीच आंध्र प्रदेशातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. छुप्या कॅमेऱ्यांद्वारे (Hidden Camera) विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांची विक्री केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 300 फोटो-व्हिडीओ लीक झाले आहेत. ज्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही चेंजिंग रुम, वॉशरूममधील छुपा कॅमेरा ओळखण्यास मदत होईल.
हॉटेल, कॅफे, मॉल्स, वॉशरूममध्ये छुपे कॅमेरे?
10 ऑगस्ट रोजी, कर्नाटकातील बेंगळुरू येथे सुद्धा असेच एक प्रकरण उघडकीस आले होते, जेथे कॉफी शॉपच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडला होता. हा कॅमेरा टॉयलेट सीटसमोरील डस्टबिनमध्ये लपवून ठेवला होता. हे डिजिटल आणि हायटेक कॅमेऱ्यांचे युग आहे, ज्याचा वापर करून अशा गुन्हेगारी घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत हॉटेल, कॅफे, मॉल्स किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या वॉशरूममधील चेंजिंग रूममध्ये अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.
छुपा कॅमेरा म्हणजे काय? तो कसा काम करतो?
हा कॅमेरा अशा ठिकाणी बसवण्यात येतो, जिथे तो लोकांना दिसू शकत नाही. त्यांना स्पाय कॅमेरा असेही म्हणतात. हे सहसा इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर्सने सुसज्ज असतात, ज्याच्या मदतीने कॅमेरा अंधारातही काहीही रेकॉर्ड करू शकतो. जिथे हा कॅमेरा असेल याची आपल्याला पुसटशीही कल्पना येणार नाही. बंगळुरूमधील एका कॉफी शॉपच्या वॉशरूममधील डस्टबिनमध्ये कॅमेरा बसवण्यात आला होता. सहसा छुपे कॅमेरे खूप लहान आकाराचे असतात. त्यामुळे पुस्तके, खेळणी, खिडक्या-दारे, घड्याळ, दिवे, पडदे यासारख्या वस्तूंभोवती ते सहज लपवता येतात. हे रिमोट कंट्रोलसारखे काम करते. ते ब्लूटूथ किंवा वाय-फायच्या मदतीने देखील ऑपरेट केले जाऊ शकते.
हॉटेल, चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला की नाही? कसे जाणून घ्याल?
हॉटेल, चेंजिंग रूममध्ये लपलेल्या किंवा हिडन कॅमेऱ्यांमध्ये हिरव्या किंवा लाल LED दिवे असतात, जे नेहमी चमकत असतात. म्हणून, हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये कॅमेरा शोधण्यासाठी, प्रथम सर्व दिवे बंद करा जेणेकरून खोली पूर्णपणे अंधार होईल. बाहेरून प्रकाश येत असल्यास, खिडकीतून पडदे बाजूला काढा. आता कोणताही लाईट चमकत आहे की नाही हे पाहण्यासाठी पूर्ण अंधारात प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक तपासा.
कोणते मोबाईल ॲप्स छुपे कॅमेरे शोधण्यात मदत करतात?
आजकाल, प्ले स्टोअरमध्ये असे बरेच ॲप्स उपलब्ध आहेत, जे हॉटेल किंवा चेंजिंग रूममध्ये छुपे कॅमेरे सहजपणे शोधू शकतात. या सर्व ॲप्समध्ये एक स्कॅनर आहे, ज्याद्वारे संशयास्पद ठिकाणे स्कॅन केली जातात.
हे मोबाईल ॲप्स कसे वापरले जातात?
हे मोबाईल ॲप्स वापरणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुमच्या फोनमधील ॲप ओपन करा. यानंतर, तुम्हाला संशयास्पद वाटणाऱ्या डिव्हाइसजवळ फोन घ्या. जसे शॉवर, आरसा किंवा इतर कोणतीही वस्तू. ॲप त्या उपकरणाजवळ येताच चुंबकीय लहरींचे विश्लेषण करेल. जेव्हा कोणत्याही प्रकारची अशा लहरी जुळतात तेव्हा मोबाइल फोनमधून बीप आवाज येऊ लागतो. यानंतर तुम्ही त्या जागेची सविस्तर चौकशी करू शकता.
हॉटेल्स किंवा चेंजिंग रूममध्ये कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी?
- पोलिसांच्या माहितीनुसार अशा घटना कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता.
- सार्वजनिक ठिकाणी आपण सतर्क राहणे गरजेचे आहे.
- हॉटेलच्या खोलीत किंवा मॉलच्या ट्रायल रूममध्ये बदलण्यापूर्वी तुमचे कपडे नीट तपासा.
- काही शंका असल्यास ताबडतोब जबाबदार अधिकारी किंवा पोलिसांकडे तक्रार करा.
- तुम्ही हॉटेलच्या खोलीत वापरत असलेली उपकरणेच प्लग इन करून ठेवा.
- इतर सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा.
- बाथरूममध्ये किंवा चेंजिंग रूममध्ये मिररच्या मागे छुपा कॅमेरा लपवणे सोपे आहे.
- कारण प्रत्येकजण तो पकडू शकत नाही.
- यासाठी फिंगर टेस्ट करणे आवश्यक आहे. म्हणजेच, तुमचे एक बोट आरशावर ठेवण्याचा प्रयत्न करा.
- रिफ्लेक्शन आणि रिअल बोट यांच्यात जर अंतर नसेल तर इथे छुपा कॅमेरा असू शकतो.
- फोनवर बोलत असताना आवाज ब्रेक होणे,
- खडखडाटाचा आवाज किंवा कंपन येत असल्यास खोली तपासा.
- हॉटेल आणि मुलींच्या PG च्या भाड्याच्या खोलीत,
- सेटअप बॉक्स, दिवा, गेट हँडल, घड्याळ, स्मोक डिटेक्टर आणि आरसा, बाथरूममधील खिडकी नीट तपासा.
हेही वाचा>>>
Women Safety : महिलांनो..आता आवाज उठवण्याची वेळ आलीय, हिंसाचाराबद्दल गप्प बसू नका, 'या' नंबरवर कॉल करा, काही मिनिटांत पोलिस पोहोचतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )